कोकणाला २ सहस्र कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती ! – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

रत्नागिरी (जिमाका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकणाला अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना संमती देण्यात आली आहे. यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील जालगाव येथे अर्थसंकल्प/पुरवणी अर्थसंकल्पामधील संमत विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. या वेळी केदार साठे, संजय सावंत यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘‘जिल्ह्याला शासनाच्या माध्यमातून भरीव निधी देण्यात आलेला आहे. शासनाच्या विविध योजना आहेत, त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या शासनाच्या काळात सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने विविध विकासकामांना संमती देण्यात आली आहे. प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी हाती घेण्यात आले आहेत. आंबेत पुलाची दुरुस्ती यांसारखी जी कामे प्रलंबित होती, त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.’’