रत्नागिरीत सागर महोत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी – जगातले काही देश केवळ समुद्रावरच अवलंबून आहेत. त्यांची अर्थव्यवस्था त्यावरच चालते. भारताला लाभलेल्या सागरी ताकदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. समुद्रातील खनिजसंपत्ती, तेल, कोरल्स संशोधनासाठी मोठी संधी आहे. तसेच समुद्रात प्लास्टिक आणि अन्य प्रदूषण होऊ नये; म्हणून काम केले पाहिजे. नेव्ही, कोस्टगार्ड, सागरी पोलीस संरक्षण करत आहेत. पूर्वीपासून भारतियांना समुद्री व्यापाराची उत्तम माहिती, ज्ञान होते; परंतु इंग्रजांच्या काळात हे ज्ञान आपण विसरलो, आता ते पुन्हा आठवूया आणि प्रत्येकाने योगदान देऊया. या सार्‍यातून भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन होणार आहे, असे प्रतिपादन भारतीय नौसेनेचे कमोडोर श्रीरंग जोगळेकर (निवृत्त) यांनी केले.

आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित द्वितीय सागर महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक, एन्.आय.ओ. संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते. या महोत्सवाकरता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासह राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी- इंडिया, कोस्टल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे. महोत्सवाती कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत.

डॉ. सुरेश नाईक म्हणाले की, मी ३४ वर्षे सागरी क्षेत्राशी निगडित आहे. समुद्राचे जग वेगळे आहे. या महोत्सवाची संकल्पना सुरेख असून यापुढे नेहमी मत्स्य महाविद्यालय आपल्यासोबत आहे. यंदा आमचे विद्यार्थी थायलंड आणि अन्य देशांत अभ्यास दौर्‍यावर जाऊन आले. त्यांना समुद्री जगातील घडामोडी समजल्या.

डॉ. ठाकूर म्हणाले, ‘‘या महोत्सवाची कल्पना खूपच आनंददायी आहे. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेमध्ये विकसित केलेल्या ‘सी बोट रोबोट’चे प्रात्यक्षिक या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे.  सी बिड कल्टिवेशनचे काम सडामिर्‍या येथे चालू आहे. तसेच कोरल्सची जैवविविधता यावरही रत्नागिरी व परिसरात संशोधन चालू आहे. आतापर्यंत ५-६ कोरल्स शोधली आहेत. नवीन कोरल्सचा शोध चालू आहे. येथील खारफुटी असेल वा सागर किनार्‍यांवरील जैवविविधतेचा उपयोग आम्ही संशोधनासाठी करतोय.
आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन यांनी प्रास्ताविकामध्ये म्हणाले की, आसमंत फक्त पर्यावरण, निसर्ग यासाठी अधिकाधिख चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. नुलकर यांच्याशी चर्चेनंतर सागर महोत्सव चालू झाला. हे दुसरे वर्ष असून पर्यावरण जागृतीसाठी हा महोत्सव उपयुक्त ठरत आहे. या वेळी आसमंतचे संचालक पुरुषोत्तम पेंडसे, नितीन करमरकर, श्रीप्रसाद देशमुख, जगदीश खेर आदींसह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

सामंजस्य करारासाठी इच्छुक !

डॉ. मकरंद साखळकर यांनी सांगितले की, आसमंत आणि सहकारी संस्थांच्या सोबत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय सामंजस्य करार करण्यास तयार आहे. महाविद्यालय आता स्वायत्त असून समुद्रविषयक अल्पकालीन व पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सागराविषयीची जाणीव निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होणार आहे.

१२ जानेवारीचे कार्यक्रम

१२ जानेवारीला सकाळी पुळणीकिनारा अभ्यास फेरी होईल. यात मार्गदर्शक प्रदीप पाताडे, डॉ. अमृता भावे अभ्यासपूर्ण माहिती देतील. ९.३० वाजता आधुनिक मासेमारी तंत्रज्ञान यावर डॉ. विजय मुळ्ये यांचे व्याख्यान, १०.३० वाजता लघुपट, ११.१५ वाजता वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी- इंडियाचे डॉ. अनंत पांडे सागरी सस्तन प्राण्यांवर व्याख्यान देतील. १२.१५ वाजता लघुपट, १.३० ते २ लघुपट, २ वाजता आसमंतचा किनारे संवर्धन प्रकल्प यावर डॉ. प्रशांत अंडगे यांचे व्याख्यान होईल. २.३० ते ३ या वेळेत इकोलॉजिकल सोसायटीच्या सायली नेरूरकर व्याख्यान देतील. ३ ते ४ या वेळेत नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनतर्फे व्याख्यान होईल. ४ वाजता लघुपट दाखवला जाईल. त्यानंतर ५ ते ६.३० या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी या खडकाळ किनार्‍यावर सफर निघेल. यात प्रदीप पाताडे मार्गदर्शन करतील.

भारतीय नौसेनेच्या युद्धनौका आणि पाणबुडीची लाकडापासून बनवलेली मॉडेल्स महोत्सवात ठेवली आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रत्नागिरीकरांनाही ही मॉडेल्स नक्कीच आवडतील. साधारण ५ फूट लांबीची ही मॉडेल्स महोत्सवादरम्यान पहाता येतील.