Ayodhya Hotel Rent Hiked : अयोध्येत हॉटेलमधील खोल्यांच्या एका दिवसाच्या भाड्यात ५ पटींनी वाढ !

अयोध्या (उत्तरप्रदेश) : भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला येणार्‍या भाविकांच्या संख्येत प्रतिदिन वाढत होत आहे. यामुळे येथील हॉटेल्सचे भाडे आणि भोजनाचे दर यांत वाढ झाली आहे. येथे हॉटेलमधील एका दिवसाच्या खोलीचे भाडे ५ पटींनी वाढले आहे. काही आलिशान खोल्यांचे भाडे १ लाख रुपयांवर गेले आहे. विशेष म्हणजे भाड्यात एवढी मोठी वाढ होऊनही हॉटेलचे आरक्षण प्रतिदिन वाढत आहे. २२ जानेवारीला देशभरातून अनुमाने ३ ते ५ लाख लोक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अयोध्येतील बहुतेक हॉटेल्स आधीच भरलेली आहेत आणि ज्या हॉटेलमध्ये २२ जानेवारीला खोल्या उपलब्ध आहेत, त्यांच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

(सौजन्य : Business Today)

१. येथील ‘सिग्नेट कलेक्शन’ हॉटेलमधील खोलीचे सध्याचे भाडे ७० सहस्र २४० रुपये आहे. गेल्या वर्षी जानेवारीत या खोलीचे भाडे केवळ १६ सहस्र ८०० रुपये होते, म्हणजेच त्यात ४ पट वाढ झाली आहे.

२. ‘रामायण’ हॉटेलमध्ये एक खोली एका दिवसासाठी ४० सहस्र रुपयांमध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षी तिचे भाडे १४ सहस्र ९०० रुपये होते.

३. हॉटेल ‘अयोध्या पॅलेस’ १८ सहस्र २२१ रुपयांना एक दिवसासाठी एक खोली देत आहे. गेल्या वर्षी या हॉटेलमधील एका खोलीचे भाडे ३ सहस्र ७२२ रुपये होते.

संपादकीय भूमिका

यावर सरकारने नियंत्रण आणून भाविकांची लूट थांबवावी, अशी अपेक्षा !