उत्तरेतील सीमेवर संवेदनशील स्थिती ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

नवी देहली – भारताच्या उत्तरेतील सीमेवरील स्थिती स्थिर असली, तर संवेदनशील आहे. आमच्याकडे पुरेशी क्षमता असून आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढ करत आहोत, अशी माहिती सैन्यदल प्रमुख मनोज पांडे यांनी दिली.

१. लडाख येथील चीनशी झालेल्या वादावरून सैन्यदल प्रमुख पांडे म्हणाले की, सैन्य आणि राजकीय या दोन्ही स्तरांवर चीनशी चर्चा चालू आहे. चर्चेमध्ये आमचे प्राधान्य एप्रिल २०२० ची स्थिती पुन्हा आणण्याला आहे. यानंतर अन्य सूत्रांवर लक्ष दिले जाईल. आमच्याकडे कोणत्याही स्थितीला सामोरे जाऊन त्यावर नियंत्रण मिळवण्याची पुरेेसे बळ आहे.

२. काश्मीरच्या स्थितीविषयी सैन्यदल प्रमुख पांडे म्हणाले की, येथे घुसखोरीच्या घटना घडत असून आम्ही त्या हाणून पाडत आहेत. तेथे युद्धविरामाची स्थिती कायम आहे. काश्मीरमध्ये हिंसा न्यून झाली आहे. गेल्या वर्षी राजौरी आणि पुंछ येथे २० सैनिकांना वीरगती मिळाली. यातून आम्ही धडा घेतला आहे.

३. मणीपूरमधील हिंसाचारावर सैन्यदल प्रमुख पांडे म्हणाले की, मणीपूरमध्ये आम्ही प्रशासनाला साहाय्य करत आहोत. सैन्याने संयमाने काम केले आहे. आमची लुटलेली शस्त्रे परत मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

४. चीन आणि भुतान यांच्यातील चर्चेकडे आमचे लक्ष आहे. भुतानशी आमचे दृढ संबंध आहेत. त्याच्याशी आम्ही सतत संपर्कात आहोत, असेही सैन्यदल प्रमुख पांडे यांनी स्पष्ट केले.