Goa : जाधव आयोगाचा अहवाल मंत्रीमंडळाने स्वीकारला !

  • गोव्यातील भूमी बळकावल्याचे प्रकरण

  • भूमी परत घेण्यासाठी सरकार लवकरच पावले उचलणार !

पणजी, १० जानेवारी : गोव्यातील भूमी बळकावल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांच्या अध्यक्षतेखालील १ सदस्याच्या आयोगाने सादर केलेल्या अहवालाला राज्य मंत्रीमंडळाने संमती दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आयोगाने नोव्हेंबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात त्याचा अहवाल सादर केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘अहवालात दिलेल्या सूचनांची सरकार योग्य वेळी कार्यवाही करील. बनावट कागदपत्रे वापरून बळकावलेल्या आणि विकल्या गेलेल्या सरकारी अन् कुणाच्याही नावावर नसलेल्या भूमी परत घेण्याचे काम सरकार प्रथम करील. आयोगाच्या अहवालात भूमी परत मिळवण्यासाठी दावा करण्याच्या सूचना आहेत. अहवालात पुराभिलेख कागदपत्रे कह्यात घेण्याविषयी आणि त्यांचे डिजिटायझेशन करण्याच्या सूचना आहेत. या प्रकरणी ३ सरकारी कर्मचार्‍यांसह ९ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व प्रकरणांत संबंधित संशयितांवर आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले जाईल. विशेष अन्वेषण पथकाचे (एस्.आय.टी.चे) अन्वेषण पूर्ण होऊन हे पथक या प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर बळकावलेल्या भूमीवर मालक दावा करू शकतात.’’


श्रीराममंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त शासकीय कार्यालये आणि  शाळा यांना २२ जानेवारीला सुट्टी

पणजी : अयोध्या येथे नूतन श्रीराममंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम २२ जानेवारीला आहे. यानिमित्त गोव्यातील शासकीय कार्यालये आणि शाळा यांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घोषित केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.