फोंडा, गोवा येथील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना पोटाचे झालेले विविध त्रास आणि पोटाच्या शस्त्रकर्माच्या वेळी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

१. पोटाचे शस्त्रकर्म करण्यापूर्वीची शारीरिक स्थिती आणि शस्त्रकर्म करण्याचे ठरल्यानंतर आलेले अडथळे

१ अ. पोटाच्या व्याधीच्या निवारणार्थ औषधोपचार करूनही अधूनमधून त्रास चालू राहिल्याने शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेणे : ‘मागील २ – ३ वर्षांपासून मला अधूनमधून आम्लपित्ताचा त्रास होत होता. काही खाल्ल्यानंतर जळजळ व्हायची आणि जेवण वर आल्यासारखे वाटायचे; म्हणून मी मे २०२३ मध्ये पोटाची एंडोस्कोपी (दुर्बिणीद्वारे अन्ननलिका आणि जठर याची चाचणी) करून घेतली. त्यामध्ये मला ‘हाईट्स हर्निया’ (अन्ननलिकेचा खालचा भाग रुंद होणे आणि ‘डायाफ्राम’ या स्नायूच्या थोडा वर तो ओढला जाणे) ही व्याधी जडल्याचे निदान झाले. या त्रासाचा माझ्या दैनंदिन जीवनावर किंवा सेवेत फार मोठा अडथळा येत नव्हता; पण औषधोपचार करूनही अधूनमधून हा त्रास चालूच राहिला. त्यामुळे मी शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला.

१ आ. शस्त्रकर्म करण्याचे ठरवल्यानंतर झालेले विविध शारीरिक त्रास

१. पोटाच्या एंडोस्कोपीच्या वेळी जठरामध्ये एक छोटासा व्रण (अल्सर) आढळल्याने शस्त्रकर्म ३ आठवडे पुढे गेले.

२. त्यानंतर मला असलेल्या दम्याच्या त्रासामुळे फुफ्फुसांची क्षमता मोजण्याची चाचणी केली. त्यामध्ये माझ्या फुफ्फुसांची क्षमता अल्प झाल्याचे आढळले. त्यामुळे पुन्हा शस्त्रकर्म १५ दिवस पुढे ढकलावे लागले.

३. ऑगस्ट मासात मी सर्दी-खोकल्याने रुग्णाईत झालो.

अशा प्रकारे सतत काही ना काही अडचणी येऊन मे मासात ठरलेले शस्त्रकर्म पुढे पुढे जात राहिले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कृपेमुळे शस्त्रकर्म करण्यात येणारे आध्यात्मिक अडथळे दूर होणे

२ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारल्यावर शस्त्रकर्माचा दिनांक ठरणे : शस्त्रकर्मात येणार्‍या अडथळ्यांच्या निवारणासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ते नामपादी उपाय करत होतो. त्यानंतर माझे शस्त्रकर्म करण्याचा दिनांक ठरला.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक वेळा पोटाच्या शस्त्रकर्माविषयी विचारणे : मला पोटाचा त्रास चालू झाल्यानंतर ज्या ज्या वेळी मी प.पू. डॉ. आठवले यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांच्याकडे जात असे, त्या त्या वेळी ते मला पोटाच्या शस्त्रकर्माविषयी विचारत असत. त्यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ यांच्याकडेही माझ्या पोटाच्या शस्त्रकर्माविषयी २ – ३ वेळा विचारले.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अर्धा घंटा त्यांच्याजवळ बसवून घेतल्याने ‘स्वतःवरील त्रासदायक आवरण पूर्ण गेले’, असे जाणवणे : माझ्या पोटाच्या शस्त्रकर्माच्या एक आठवड्यापूर्वी प.पू. डॉक्टरांना थोडे बरे नव्हते. त्यामुळे वैद्यकीय तपासणीनिमित्त माझी त्यांच्याशी भेट झाली. तेव्हा त्यांनी मला अर्धा घंटा त्यांच्याजवळ बसवून घेतले. त्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि काही सूत्रे वाचायला दिली. प.पू. डॉक्टरांना तपासण्यासाठी प्रतिदिन एक आठवडा त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाल्यामुळे मला त्यांचा पुष्कळ सहवास लाभला. ‘त्यांच्यातील चैतन्यामुळे माझ्यावरील त्रासदायक आवरण पूर्ण गेले’, असे मला जाणवले.

प.पू. डॉक्टर आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या कृपेमुळे माझ्या शस्त्रकर्मात येणारे आध्यात्मिक अडथळे दूर झाले आणि २६.९.२०२३ या दिवशी माझे शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडले.

३. शस्त्रकर्मानंतर झालेले त्रास

शस्त्रकर्मानंतर प्रतिदिनच मला काही ना काही त्रास होत होता.

अ. पहिल्या दिवशी रात्री माझ्या छातीत दुखू लागले.

आ. दुसर्‍या दिवशी माझ्या रक्तातील प्राणवायूची मात्रा न्यून झाली.

इ. तिसर्‍या दिवशी माझी लघवी तुंबली.

ई. नंतर माझ्या फुफ्फुसात पाणी झाले.

उ. एकदा माझी प्राणशक्ती पुष्कळ अल्प झाली.

४. शस्त्रकर्मानंतर झालेल्या त्रासांवर संतांनी केलेले उपाय

अ. शस्त्रकर्माच्या पहिल्याच दिवशी प.पू. गुरुदेवांनी आश्रमातून माझ्यासाठी विभूती पाठवली.

आ. शस्त्रकर्मानंतर प्रतिदिन मला होणार्‍या वेगवेगळ्या त्रासांवर सद्गुरु गाडगीळकाकांनी प्रतिदिन नामजपादी उपाय सांगितले.

इ. सद्गुरु गाडगीळकाकांनी स्वतःही माझ्यासाठी नामजपादी उपाय केले आणि आवश्यक त्या वेळी इतर संतांनाही माझ्यासाठी नामजपादी उपाय करायला सांगितले.

५. पोटांच्या विकारांचे तज्ञ आधुनिक वैद्य अलवारीस यांची झालेली भेट !

५ अ. आधुनिक वैद्यांनी एक दिवस उशिरा घरी सोडणे : शस्त्रकर्मानंतर तिसर्‍या दिवशी संध्याकाळी मला रुग्णालयातून घरी सोडणार होते; पण आधुनिक वैद्यांनी तो निर्णय पालटला. तिसर्‍या दिवशी ते म्हणाले, ‘‘उद्या सकाळी घरी जा.’’ मला त्याच दिवशी संध्याकाळी घरी जाण्याची इच्छा होती; पण आधुनिक वैद्यांनी न सोडल्यामुळे मी रुग्णालयात थांबलो.

५ आ. पोटाच्या विकारांचे तज्ञ आधुनिक वैद्य अलवारीस यांचे मार्गदर्शन मिळणे : त्या दिवशी रात्री आधुनिक वैद्य अलवारीस रुग्णालयात मला भेटायला खोलीत आले. त्यांनी या शस्त्रकर्मानंतर उर्वरित आयुष्यात ‘काय काळजी घ्यायला पाहिजे ?’, याविषयी मला सविस्तर मार्गदर्शन केले.

५ इ. देवाच्या नियोजनाची जाणीव होणे : हे मार्गदर्शन मिळाल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘मला अधिक एक दिवस रुग्णालयात थांबावे लागणे आणि पोटाच्या विकारांचे तज्ञ आधुनिक वैद्य अलवारीस यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळणे’, हे सर्व देवाचे नियोजन होते.’

६. कृतज्ञता

‘प.पू. गुरुदेवांची असीम कृपा आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी सांगितलेले नामजपादी उपाय यांमुळे मला होणारे त्रास अल्प काळात उणावले आणि मी व्यवस्थित बरा झालो’, यासाठी मी त्या दोघांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, फोंडा, गोवा. (८.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक