प्रार्थना केल्यावर गुरुकृपेने अडचणी दूर होऊन शिबिराला जाता आल्याची अनुभूती घेणार्‍या रायचुरू (कर्नाटक) येथील कु. स्वप्ना विद्यासागर !

कु. स्वप्ना विद्यासागर

१. रामनाथी (गोवा) येथे शिबिरासाठी जाण्याच्या कालावधीतच महाविद्यालयाने शैक्षणिक सहलीसाठी दुसर्‍या राज्यात जाण्याचे दायित्व देणे : ‘मी एका महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) आहे. ५ ते १२ जानेवारी २०२२ या कालावधीत मला शैक्षणिक सहलीसाठी (state exposure visit duty) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुसर्‍या राज्यात घेऊन जाण्याचे दायित्व मिळाले होते. त्याच कालावधीत, म्हणजे ५ ते १२ जानेवारी २०२२ पर्यंत मला रामनाथी (गोवा) येथे ‘शिबिरा’ला जायचे होते. त्यामुळे ‘महाविद्यालयाच्या कामासाठी जाण्याऐवजी शिबिराला जावे’, असे मला प्रकर्षाने वाटत होते.

२. भगवंताला प्रार्थना केल्यावर शिबिरासाठी जाण्यातील अडथळे दूर झाल्याने कृतज्ञता वाटणे : मी भगवंताच्या चरणी प्रार्थना केली, ‘भगवंता, मला काहीच ठाऊक नाही. शिबिरासाठी माझी निवड तुम्हीच केली आहे. तुम्हीच मला बोलावून घ्या. माझ्या स्वभावदोषांमुळे मी पुष्कळ मागे पडले आहे. मी माझ्या बुद्धीचा अनावश्यक वापर करून सेवेपासून दूर रहाते. मला तुमच्या कृपेस पात्र बनवा. कृतार्थ करा.’ मी पुनःपुन्हा अशी प्रार्थना करत होते. त्यानंतर ३.१.२०२२ या दिवशी संध्याकाळी मी महाविद्यालयातील वर्ग संपवून रायचूरुला येत असतांना मला महाविद्यालयातून दूरभाष आला आणि सांगितले, ‘‘काही कारणास्तव महाविद्यालयाची शैक्षणिक सहल पुढे ढकलली गेली आहे.’’ या व्यतिरिक्त महाविद्यालयाकडून मला ५ ते ७.१.२०२२ या कालावधीत चेन्नईला जाण्याचाही निरोप आला होता; पण ‘तेही रहित झाले आहे’, हे ऐकल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३. भगवंतावर भार सोपवून महाविद्यालयात सुटीचा अर्ज दिल्यावर सुटीची अनुमती लगेच मिळाल्याने भाव जागृत होणे : मला शिबिराला जाण्यासाठी महाविद्यालयातून ५ दिवसांची सुटी हवी होती; पण महाविद्यालयात शिक्षकांची उपस्थिती अल्प असल्याने मला सुटी मिळणे कठीण होते.  मी भगवंतावर भार सोपवून मी दुसर्‍या दिवशी आमच्या विभागप्रमुखांकडे ५ दिवसांची सुटी मिळण्यासाठी अर्ज केल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी तुम्हाला हवी तेवढी सुटी देतो.’’ त्यांनी मी केलेल्या अर्जावर लेखी अनुमती दिली. माझ्या सहकार्‍यांना याविषयी सांगितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला; कारण त्यांना १ दिवसही सुटी मिळत नव्हती. तेव्हा भगवंताच्या चरणी  कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत झाला.’

– कु. स्वप्ना विद्यासागर, रायचुरू, कर्नाटक. (९.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक