आज ११.१.२०२४ या दिवशी कै. (श्रीमती) उषा मोहे यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
३०.१२.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्या श्रीमती उषा मोहे (वय ८१ वर्षे) यांचे निधन झाले. ११.१.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या काही सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे आपण काल पाहिली. आज त्यापुढील सूत्रे दिली आहेत. (भाग २)
५. सौ. श्रावणी रामानंद परब आणि सौ. मनीषा दामोदर गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ अ. स्वावलंबी आणि निर्भय : ‘मोहेकाकू पुण्याला ३० वर्षे एकट्याच रहात होत्या. काकूंचे वय ८१ वर्षे असूनही त्या पुण्याला घरी जातांना आणि रामनाथी आश्रमात येतांना एकटीने प्रवास करत असत.
५ आ. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा : काकूंच्या कपाटातील कप्पा नीटनेटका असायचा. काकूंना रुग्णालयात भरती करायचे होते. तेव्हा त्यांचे साहित्य बॅगमध्ये भरायला आम्हाला ५ – १० मिनिटेच लागली; कारण त्यांचे सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले होते. त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात नेता आले.
५ इ. प्रेमभाव : एकदा मला (सौ. श्रावणी रामानंद परब यांना) पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. त्या वेळी काकूंना माझ्यासाठी नामजपादी उपाय करायला सांगितले होते. तेव्हा त्यांनी नामजपादी उपाय केले. त्यानंतर दिवसातून बर्याच वेळा त्या माझ्या खोलीत येऊन माझी विचारपूस करत होत्या, ‘‘तू बरी आहेस ना ? तू काही खाल्लेस का ?’’
५ ई. परिस्थितीशी जुळवून घेणे : काकू नेहमी पहाटे ४ वाजता उठून अंघोळ करून नामजप करत असत. कधी कधी पहाटे ४ वाजता अंघोळीसाठी गरम पाणी नसायचे, तरी त्यांनी त्याविषयी कधीच गार्हाणे केले नाही.
५ उ. अत्यावश्यक असतांनाच इतरांचे साहाय्य घेणे : रुग्णालयात काकूंच्या समवेत एका साधिकेला पाठवले होते. काकूंचा मुलगा रुग्णालयात आल्यावर काकूंनी ‘त्या साधिकेची सध्या आवश्यकता नाही’, असे म्हणून तिला आश्रमात परत पाठवले. त्यांच्या सर्व तपासण्या शनिवारी होणार होत्या. तेव्हा त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी आम्हाला भ्रमणभाषवर निरोप दिला, ‘‘मी एकदम बरी आहे. मी स्वतः माझे सर्व करू शकते, तसेच माझा मुलगा समवेत असल्यामुळे या साधिकेची आश्रमात सेवा होईल.’’ काकू अत्यावश्यक असेल, तेव्हाच इतरांचे साहाय्य घेत असत.
५ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा : काकूंना पुष्कळ घरगुती अडचणी होत्या; पण त्या त्यांचे ओझे घेऊन कधीच राहिल्या नाहीत. ‘ते माझे प्रारब्ध आहे. ते मला भोगायचे आहे. प.पू. गुरुदेव मला सहन करण्याची शक्ती देणार आहेत’, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती.
६. कु. सिद्धि गावस, पर्वरी, गोवा.
६ अ. स्वावलंबी आणि इतरांचा विचार करणे
१. ‘काही दिवसांपूर्वी एकदा रात्री मोहेकाकूंना बरे वाटत नसतांना त्या स्वतः एकट्याच त्यांच्या खोलीतून चिकित्सालयापर्यंत गेल्या. हे त्यांनी मला सांगितल्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही एकटीने जाण्याऐवजी मला भ्रमणभाष केला असता, तर मी तुमच्या साहाय्यासाठी आले असते.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी स्वतः करू शकत असतांना इतरांना त्रास का द्यायचा ?’’
२. रुग्णालयात भरती झाल्यावरसुद्धा काकूंनी मला त्यांची कोणत्याही प्रकारची सेवा करू दिली नाही. मी त्यांच्या साहाय्याला उभी जरी राहिले, तरी त्या मला बसायला सांगायच्या. स्वतःच प्रत्येक कृती करायच्या. वयोमानामुळे काही गोष्टींना मर्यादा यायच्या; पण त्यांना पूर्ण विश्वास होता, ‘देव माझ्याकडून इतरांच्या साहाय्याविना प्रत्येक कृती करून घेणार.’ रात्री मी त्यांच्या बाजूला झोपलेले असूनही त्यांनी मला त्यांच्या साहाय्यासाठी मुळीच उठवले नाही. त्या स्वतःच अल्प उजेडात प्रसाधनगृहात जाऊन येत असत.
३. काकूंना एका डोळ्याने अल्प दिसायचे; पण गेली कित्येक वर्षे त्यांनी ‘इन्सुलीन’चे (टीप १) इंजेक्शन पोटावर टोचून घेण्यासाठी कधीही इतरांचे साहाय्य घेतले नाही.
टीप १ – इन्सुलीन – रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक (औषध)
६ आ. स्थिर, सकारात्मक आणि निश्चिंत असणे : काही दिवसांपूर्वी काकूंना रुग्णालयात भरती केले असतांना मला त्यांच्या समवेत जाण्याची संधी मिळाली. मी २ दिवस त्यांच्या समवेत होते. तेव्हा मला त्या घाबरलेल्या, चिंताग्रस्त किंवा नकारात्मक विचारांत दिसल्या नाहीत. त्यांना आश्रमातून रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठवले. त्या वेळीही काकू नेहमीप्रमाणे स्थिर आणि सकारात्मक होत्या. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप काकू करत होत्या. मी प्रथमच असा रुग्ण पाहिला की, ज्याला कशाचीही चिंता नाही.
६ इ. प्रतिकूल परिस्थिती सकारात्मक राहून स्वीकारणे : काकूंची ‘अँजिओग्राफी’ (टीप २) झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी काकूंच्या समोरच त्यांच्या मुलाला काकूंच्या शारीरिक स्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘त्यांच्या हृदयाला जोडणार्या रक्तवाहिन्यांमध्ये बरेच अडथळे (ब्लॉक्स) आहेत. एरव्ही अशा वेळी रुग्णाचे ‘बायपास’ शस्त्रकर्म करावे लागते; पण काकूंचे वय अधिक असल्याने आपण २ दिवसांनी त्यांची ‘अँजिओप्लास्टी’ (टीप ३ ) करूया; पण तोपर्यंत त्यांना आश्रमात पाठवण्याएवढी त्यांची शारीरिक स्थिती नाही. त्यांची स्थिती पुष्कळ नाजूक आहे.’’ हे ऐकूनसुद्धा त्या पुष्कळ आनंदी होत्या. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाचे आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनीही पुष्कळ कौतुक केले.
टीप २ – अँजिओग्राफी : ‘क्ष’ किरणांनी केलेली रक्तवाहिन्यांची तपासणी
टीप ३ – अँजिओप्लास्टी : हृदयाकडे रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यांतील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म
६ ई. शेवटपर्यंत आनंदी आणि उत्साही असणे : मोहेकाकू म्हणजे एक आनंदी आणि उत्साही व्यक्तीमत्त्व ! त्यांची ही स्थिती शेवटपर्यंत टिकून होती. मी त्यांच्या समवेत रुग्णालयात असतांना २ दिवसांमध्ये मी त्यांच्या तोंडून इतरांशी बोलतांना ‘मला बरे वाटत नाही’, असे कधीच ऐकले नाही.
‘देवा, ‘तू मला मोहेकाकूंच्या सेवेची संधी दिलीस’, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.’
७. श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘३०.१२.२०२३ या दिवशी श्रीमती उषा मोहे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी ‘त्यांच्या देहाची शुद्धी करणे, त्यांना नवीन वस्त्र नेसवणे’ इत्यादी सेवांत मी सहभागी झाले होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
७ अ. पार्थिव ठेवलेल्या खोलीत चांगली स्पंदने जाणवणे : ज्या खोलीत काकूंचे पार्थिव ठेवले होते, तेथील स्पंदने पुष्कळ चांगली होती. ‘तिथे कोणत्याही प्रकारचा दाब किंवा वाईट शक्तीचे आवरण आले आहे’, असे मला जाणवत नव्हते.
७ आ. पार्थिवाला वस्त्र नेसवतांना ‘देह अतिशय हलका झाला आहे’, असे मला जाणवले.
७ इ. चांगली, वाईट किंवा मृत्यूची स्पंदने न जाणवणे : वस्त्र नेसवून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा पार्थिवाची आणि त्या खोलीतील स्पंदने अनुभवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पार्थिवाकडे पाहून चांगली किंवा वाईट, अशी कोणतीच स्पंदने किंवा मृत्यूचीही स्पंदने जाणवली नाहीत.
७ ई. काकू मला अतिशय शांत आणि निरिच्छ वाटल्या.
७ उ. मृतदेहाचे अस्तित्व न जाणवणे : काकूंच्या मृत्यूची वार्ता ऐकताच ‘पूर्णपणे निरपेक्ष आणि निरिच्छ स्थितीला पोचायला हवे अन् मन कशातच अडकायला नको’, असा विचार माझ्या मनात आला.
काकूंची धाकटी बहीण अंत्यसंस्कार विधीसाठी आली होती. त्या आजींच्या पार्थिवाजवळील पलंगावर बसल्या होत्या. मी दोघींच्या मध्ये उभी राहून बोलत होते. त्या वेळी ‘खोलीत शेजारी मृतदेह ठेवला आहे’, याची मला पुसटशीही जाणीव होत नव्हती. काकूंच्या या स्थितीमुळेच कदाचित् वर उल्लेख केलेला विचार माझ्या मनात आला असावा.’ (समाप्त)
(सर्व सूत्रांचा दिनांक : २.१.२०२४)