Bangladesh Elections : बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंमुळे शेख हसीना यांच्या पक्षाला १०७ जागांवर मिळाला विजय !

बांगलादेशात शेख हसीना पाचव्यांदा पंतप्रधान बनणार !

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत २०४ जागा, तर अवामी लीगच्याच स्वतंत्र उमेदवारांनी ५० जागा जिंकल्या. त्यामुळे २९९ पैकी २५४ जागा मिळाल्याने शेख हसीना पाचव्यांदा  बांगलादेशाच्या पंतप्रधान बनणार आहेत. विशेष म्हणजे बांगलादेशाच्या इतिहासात प्रथमच हिंदु मतदारांनी अवामी लीगला १०७ जागी विजय मिळवून दिला.

१. निवडणुकीत माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’, तसेच जमात-ए-इस्लामी निवडणुकीपासून दूर राहिले. यामुळे ४० टक्केच मतदान झाले. त्यामुळे १० टक्के लोकसंख्येची एकगठ्ठा हिंदु मते अवामी लीगला मिळाली. यामुळे हसीना यांच्या पक्षाला १०७ जागी विजय मिळाला. यांपैकी अनेक जागांवर हिंदु मते २० ते ४० टक्के आहेत.

२. ‘हिंदु-बौद्ध-ख्रिश्‍चन ओइक्या परिषदे’च्या संस्थापकांपैकी एक राणा दासगुप्ता म्हणाले, या मतदारसंघांत हिंदु लोकसंख्या धोक्यात आहे;  म्हणून हिंदूंनी हसीना यांना मते दिली.

३. बौद्ध महासंघाचे महासचिव भिक्खू सुनंदप्रिया म्हणाले की, वर्ष १९७५ नंतर प्रथमच एकाही कट्टरपंथी समुहाने यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नाही. या संधीचा वापर आम्हाला जातीयवाद नसलेला बांगलादेश बनवण्यासाठी करायचा आहे. यंदा आम्ही कोणत्याही विशिष्ट पक्षाकडे पाहिले नाही, तर जातीयवाद नसलेल्या बांगलादेशाच्या निर्मितीसाठी जे मनापासून काम करतील, अशाच उमेदवारांना आम्ही निवडून दिले.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनी शेख हसीना यांच्या पक्षाला ‘दगडापेक्षा वीट मऊ ’ या नात्याने मते दिली आहेत. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच शेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्यांनी हिंदूंवर आक्रमणे केली होती, हे विसरता येणार नाही ! पुढील काळात हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने शेख हसीना यांच्यावर दबाव आणणे आवश्यक आहे !