Ayodhya Padyatra : भाग्यनगर (तेलंगाणा) येथील चल्ला श्रीनिवास शास्त्री अयोध्येपर्यंत करत आहेत पदयात्रा !

डोक्यावर घेतल्या आहेत ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका !

चल्ला श्रीनिवास शास्त्री यांची पदयात्रा

भाग्यनगर (तेलंगाणा) : श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. भाग्यनगर येथील चल्ला श्रीनिवास शास्त्री हे ६४ वर्षीय रामभक्त पायी अयोध्येकडे निघाले आहेत. त्यांच्यासमवेत आणखी ५ जण आहेत. ते ८ सहस्र किलोमीटरची पदयात्रा करून अयोध्येत पोचणार आहेत.

शास्त्री अयोध्या-रामेश्‍वरम् मार्गाने जात अयोध्येत पोचतील. वनवासाच्या वेळी प्रभु श्रीराम याच मार्गाने गेले होते. या काळात शास्त्री प्रभु श्रीरामाने स्थापन केलेल्या सर्व शिवलिंगांचे दर्शन घेणार आहेत. त्यांनी स्वतःच्या डोक्यावर सोन्याच्या पादुका घेतल्या आहेत. त्यांचे मूल्य अनुमाने ६४ लाख रुपये आहे. या पादुका ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोपवणार आहेत. विशेष म्हणजे शास्त्री यांनी यापूर्वी श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी चांदीच्या ५ विटाही दान केलेल्या आहेत.

१. शास्त्री म्हणाले की, माझ्या वडिलांनी अयोध्येमध्ये कारसेवा केली होती. ते पवनपुत्र हनुमानाचे भक्त होते. अयोध्येमध्ये भव्य श्रीराममंदिर बनावे, ही त्यांचीही इच्छा होती. आता ते जिवंत नाहीत; मात्र त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असून खारीचा वाटाही उचलत आहे.

२. चल्ला श्रीनिवास शास्त्री ‘अयोध्या भाग्यनगर सीताराम फाऊंडेशन’चे संस्थापकही आहेत. आता त्यांनी कायमस्वरूपी अयोध्येमध्ये स्थायिक होण्याची योजना आखली असून येथे घर बनवण्याचाही निर्णय घेतला आहे.