सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करण्याची मागणी !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

आंदोलनास उपस्थित धर्मप्रेमी

जळगाव – वक्फ बोर्डचा काळा कायदा रहित करण्यात यावा, महाराष्ट्रात आणि देशात हलाल उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी ४ जानेवारी या दिवशी येथील शिवतीर्थ मैदानात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे उपरोक्त मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आकाश फडे, हिंदु महासभेचे अधिवक्ता गोविंद तिवारी, योग वेदांत सेवा समितीचे श्री. अनिल चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, वारकरी संप्रदाय, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत सेवा समिती, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी वक्फ बोर्डाने भूमी बळकवल्याविषयी सावदा येथील श्री. महेश अकोले, भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजाच्या त्रासाविषयी जळगाव येथील श्रीमती सुजाता देशपांडे, अधिवक्ता गोविंद तिवारी, योग वेदांत सेवा समितीचे श्री. अनिल चौधरी, शिरसोली येथील श्री. पंकज वराडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही अवैध हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादन यांवर बंदी घालावी ! – प्रशांत जुवेकर, उत्तर महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. प्रशांत जुवेकर

अन्नपदार्थ आणि उत्पादने यांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खासगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना काही खासगी मुसलमान संस्था अवैधरित्या ‘हलाल प्रमाणपत्र’ देऊन व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणावर लूट करत आहेत. हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादन यांवर उत्तरप्रदेश सरकारने बंदी आणली आहे, तशीच बंदी महाराष्ट्र राज्यातही घालण्यात यावी. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी गांभीर्याने नोंद घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वरीलप्रमाणे मागणी केली आहे.