रत्नागिरी – यावर्षी पावसाचे प्रमाण पहाता जिल्ह्यात पाणीटंचाई लवकरच चालू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे डिसेंबरपूर्वीच प्रत्येक तालुक्याचा पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत लांजा आणि संगमेश्वर या दोनच तालुक्यांचे आराखडे सादर करण्यात आले असून उर्वरित तालुक्यांमधील पाणीटंचाई कृती आराखडा सादर न झाल्याने एकत्रित पाणीटंचाई कृती आराखडा रखडला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण वर्ष २०२२ पेक्षा थोडे अधिक असले, तरी सप्टेंबरअखेर पावसाळा संपला असून थंडीच्या दिवसांतही थंडी न्यून असून वाढत्या तापमानामुळे जिल्ह्याला पाणीटंचाईला लवकर सामोरे जावे लागेल, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. मागील वर्षी ११२ गावांमधील २१८ वाड्यांवर २० टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. अशी स्थिती असतांनाही तालुका स्तरावर कृती आराखड्याविषयी दुर्लक्ष केले जात आहे.
आता केवळ २ तालुक्यांचेच आराखडे सादर झाल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्ह्याचा एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार करणार कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संपादकीय भूमिकापाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता कृती आराखडे वेळेत सादर न होणे, हे लज्जास्पद ! |