खडकवाडी (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे ख्रिस्ती धर्मांतर रोखण्यास यश !

प्रार्थनेत सहभागी महिलांना कपाळावरील टिकली किंवा कुंकू काढायला लावले !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

खडकवाडी (जिल्हा पुणे), २९ डिसेंबर (वार्ता.) – येथील बाळासाहेब केरू यांच्या मालकीच्या घरामध्ये भाडेकरू असलेले विजय पंचरास यांच्या घरी ख्रिस्ती प्रार्थना चालू असल्याचे कळले. त्यानुसार ह.भ.प. राजाराम महाराज मुर्‍हे, आंबेगाव तालुक्याचे धर्म जागरण संयोजक श्री. सचिन तागड, सहसंयोजक श्री. अमोल ढगे आदी कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले असता घरामध्ये १० ते १५ जणांच्या उपस्थितीत ख्रिस्ती प्रार्थना चालू होती. या प्रार्थनेमध्ये हिंदु बांधवांकडून बायबलमधील वचननामा वाचून घेतला जात होता. या प्रार्थनेला ज्या महिला आल्या होत्या, त्यांना कपाळावरील टिकली किंवा कुंकू काढायला लावले होते. ही प्रार्थना घेण्यासाठी कोल्हापूर येथील मूळ रहिवासी जनार्दन गायकवाड हे पास्टर (पाद्री) आले होते. या प्रार्थनेसाठी मातंग समाजाचे, तसेच मराठा समाजाचे लोक उपस्थित होते. या पास्टरकडून बायबल आणि हिंदु धर्मविरोधी पुस्तके जप्त करण्यात आली. प्रार्थना घेत असलेल्या सर्वांना पारगाव पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे आणि ‘त्यांच्यावर धर्मांतर करण्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा’, अशा मागणीचे निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. – संपादक)

यामध्ये जिल्हा सहसंयोजक संतोष परदेशी, जिल्हा प्रशासकीय प्रमुख किरण मुंगसे, जिल्हा विधी प्रमुख देवराज डहाळे, डॉ. चंद्रकांत देशमुख, मा. संघचालक डॉ. भास्करजी भोसले (पुणे ग्रामीण) यांनी मार्गदर्शन केले, तसेच खडकवाडीचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि इतर लोक यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रातील धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा लवकर करण्याची आवश्यकता जाणा !