Ram Mandir Bell : श्रीराममंदिरात लावणार ६०० किलो वजनाची घंटा !

नवी देहली – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या सोहळ्याच्या निमित्ताने श्रीराममंदिरात तब्बल ६०० किलो वजनाची घंटा लावण्यात येणार आहे. ही घंटा अष्टधातूंनी बनवण्यात आली आहे. यावर मोठ्या अक्षरांत ‘जय श्रीराम’ असे लिहिलेले आहे.

उत्तरप्रदेशमधील जलेसर येथील एका कुटुंबाने या विशाल घंटेची निर्मिती केली आहे. ही घंटा बनवण्यासाठी शेकडो कामगारांनी सहकार्य केले आहे. इतर मंदिरात बसवण्यात येणार्‍या विशालकाय घंटा या ३-३ भाग जोडून लावल्या जातात; मात्र श्रीराममंदिरासाठी बनवण्यात आलेली घंटा एकाच भागात बनवण्यात आलेली असून ती अखंड आहे. घंटेचा खालच्या बाजूचा वर्तुळाकार घेरा १५ फूट एवढा आहे, तर उंची ८ फूट इतकी आहे.