दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १०८ फूट उंचीच्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना होणार !; कोयता गँग नाही ! – उपमुख्यमंत्री फडणवीस…

१०८ फूट उंचीच्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना होणार !

अक्कलकोट – श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास, हे माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी ‘श्री स्वामी समर्थ अनुभूती प्रकल्प’ सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले. राम तलाव या परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे.


कोयता गँग नाही ! – उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. वडगाव शेरी येथे काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या एका महिला पोलीस कर्मचार्‍याच्या समोर कोयत्याने आक्रमण केल्याच्या घटनेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘कोयता गँग वगैरे काही नाही. असेल तर आम्ही त्यांना ठेचून काढू.’’


‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेसाठी नोंदणी चालू !

पुणे – ‘राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणा’च्या (एन्.टी.ए.च्या) वतीने देशभरातील विद्यापिठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४’ (सीयूईटी-पीजी) ही परीक्षा ११ ते २८ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरांतील केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.