दत्तजयंतीनिमित्त माहूर येथे दत्तशिखरावर जाणार्‍या भाविकांची गैरसोय !

यवतमाळ, २८ डिसेंबर (वार्ता.) – दत्तजयंतीच्या निमित्त माहूर येथे २६ डिसेंबर या दिवशी दत्तभक्त मोठ्या प्रमाणात आले होते; मात्र प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माहूर शहरातून दत्तशिखरावर जातांना भाविकांची गैरसोय झाली. शिखरावर वाहनकोंडी होऊ नये; म्हणून भाविकांनी दुचाकी, चारचाकी, तसेच खासगी वाहने यांना तेथे जाण्यास बंदी घातली. ‘भाविकांनी त्यांची वाहने शहरामध्ये आरक्षित जागेवर ठेवून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दत्तशिखरावर जावे’, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले; पण शिखरावरील रेणुकामाता मंदिर, दत्तमंदिर आणि अनुसूयामाता मंदिर येथे जाणार्‍या भाविकांची बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे भाविकांना मनस्ताप झाला. यामध्ये वयस्कर नागरिक, महिला आणि बालके यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. ‘गर्दीचा अंदाज घेऊन बसची संख्या वाढवायला हवी होती’, असे मत भाविकांनी व्यक्त केले. शिखरावर जाण्यासाठी भाविकांची सोय व्हावी, यासाठी वाहतूक पोलीस आणि बस कर्मचारी यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला.

संपादकीय भूमिका :

याला प्रशासन आणि पोलीस यांच्यातील नियोजनशून्य कारभारच कारणीभूत आहे !