(किऑक्स म्हणजे विजेच्या खांबांवर लावलेले २ बाय ३ फूट लांबी-रुंदीचे विज्ञापन फलक)
पुणे – पुणे शहरातील रस्त्यांवरील विज्ञापन कमानी (गॅण्ट्री), विजेच्या खांबावरील ‘किऑक्स’ आणि चौका-चौकातील ‘फ्लेक्स’वर अनधिकृत विज्ञापने लावलेली आहेत. विज्ञापन अधिकृतरित्या लावण्यासाठी अनुमती देण्याची नियमावली आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्नही मिळू शकते; परंतु त्याची कार्यवाही होत नसल्याने महापालिकेची कोट्यवधी रुपयांची हानी होत आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर चर्चेला आला होता. त्याविषयी विधिमंडळ अधिवेशनातही चर्चा झाली आहे; परंतु अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न अजूनही तसाच आहे.
अशा विनापरवाना विज्ञापनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने खासगी बांधकाम व्यावसायिक, राजकीय मंडळी, विज्ञापन आस्थापने आणि विज्ञापने लावणार्या ठेकेदारांचा लाभ होत आहे. यात बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सेवा अशा विविध व्यावसायिक सर्रास अवैधपणे जाहिराती लावतात. यातून महापालिकेला मिळू शकणारे उत्पन्नही बुडत आहे.
आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, ‘‘शहरातील रस्त्यांवरील विज्ञापन कमानी आणि विजेच्या खांबावरील किऑक्सविषयी निविदाप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याविषयी नगररचना विभागाकडून भुईभाडे दर निश्चिती करून घेण्यात येत आहे. त्यानंतर ही निविदाप्रक्रिया राबवली जाणार आहे. लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करून महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केला जाईल.’’
संपादकीय भूमिका :कोट्यवधी रुपयांची हानी होऊ देणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? अनधिकृत विज्ञापन लावणार्यांवर कारवाई न करणार्या अधिकार्यांना शिक्षा होणे आवश्यक ! |