गीता मंडळात स्पर्धांमधील १५० विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण
रत्नागिरी – ज्ञान हे केवळ पुस्तकामध्ये नव्हे, तर आपल्या डोक्यात शिरले पाहिजे. तरच आपण ज्ञानी होऊ शकतो. अलीकडे आधुनिक शिक्षण घेतांना अनेकांना रामायण, महाभारत, भगवद्गीता वगैरे महान ग्रंथांचे शिक्षण कालबाह्य आहे, असे वाटते; परंतु ते कालबाह्य नसून आजही या ज्ञानाचा उपयोग मनुष्याला होत आहे. अजूनही याचे महत्त्व विसरून चालणार नाही. जसे आपल्याला कोरोना काळात आयुर्वेद आणि जुन्या औषधांचे महत्त्व समजले. त्याप्रमाणे या ग्रंथांचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असे प्रतिपादन कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.
गीता मंडळाच्या वतीने ‘गीता जयंती’चे औचित्य साधून आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. सुलेखन, चित्रकला, रांगोळी, पठण आणि भक्तीगीत स्पर्धा अन् सूर्यनमस्कार अन् योगासन स्पर्धा घेण्यात आल्या. ६ वर्षांखालील गटापासून पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये शहर परिसरातील शाळांतील ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात विजेत्या १५० विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन डॉ. मराठे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी गीता मंडळाचे कार्यवाह अधिवक्ता मिलिंद पिलणकर, विश्वस्त सुभाष भडभडे, रत्नाकर भुर्के, श्रद्धा पत्की, मीरा पिलणकर, रेश्मा भाटकर प्रमुख उपस्थित होत्या.
या वेळी कार्यवाह अधिवक्ता मिलिंद पिलणकर म्हणाले की, गीता मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गीता जयंतीनिमित्त आयोजित सर्व स्पर्धांना शाळांचा उदंड प्रतिसाद प्रतिवर्षी लाभत आहे. यापुढेही मंडळाच्या उपक्रमात सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा. गीता जयंतीला विविध संस्थांच्या सहकार्याने आयोजित संपूर्ण गीता पठण उपक्रमाला भरपूर प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात जया डावर, प्रिया निकम यांनी प्रार्थना सादर केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वस्तांसह व्यवस्थापक संदेश कीर यांनी मेहनत घेतली.