राज्यातील आरोग्यव्यवस्था मृत्यूपंथाला ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

नागपूर – नांदेड, कोल्हापूर, संभाजीनगर, ठाणे आणि कळवा येथील शासकीय रुग्णालयात औषधे आणि आधुनिक सुविधांअभावी अनेक रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागला. राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत ३४ शल्यचिकित्सकांची पदे रिक्त असतांना त्यात १२ कनिष्ठ शल्यचिकित्सक नियमात बसत नसतांना त्यांची नियुक्ती करण्यात आली. नागपूर, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर यांसह अनेक जिल्ह्यांत औषध खरेदी नाही. शासकीय रुग्णालयांना ‘हाफकीन’कडून औषध घेण्यास सांगितले आहे; मात्र त्यांना खरेदीसाठी निधीच दिलेला नाही. त्यामुळे एकूणच राज्यातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती मृत्यूपंथाला लागल्यासारखी आहे, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला. ते अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते.

१. खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचाराची घोषणा सरकारने केली आहे; मात्र पैशांअभावी उपचार होत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजना खासगी रुग्णालयात राबवण्यासाठी सरकारी अधिकारी एका रुग्ण खाटेमागे एक लाख रुपये घेतात. आरोग्य विभागाने १०८ क्रमांकाच्या नवीन रुग्णवाहिकांसाठी १० वर्षांसाठी ९ सहस्र कोटी रुपयांची निविदा काढली गेली. या गैरव्यवहारावर सरकार काय करणार आहे ? १०८ क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका या विनामूल्य सेवा देत असतांना त्यांची सध्याची स्थिती काय आहे ?

२. एकीकडे वर्धा-गडचिरोली येथे मद्यबंदी आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे खासगी बसमधून मद्याचा व्यवसाय होतो ! याकडे सरकारचे दुर्लक्ष का ?

३. राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळलेली असून नागपूरमध्ये सर्वाधिक गुन्हे घडत आहेत. विदर्भाची सगळी पिढी व्यसनाधिनतेकडे वळत आहेत ! राज्यात संघटित गुन्हेगारीत वाढ झाली असून दिवसाढवळ्या खून होत आहेत. नागपूरचे पालकमंत्री हे गृहमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास ते अपयशी ठरले आहेत.

४. महसूल विभागात पैसे घेतल्याविना काम होत नसून अधिकार्‍यांच्या स्थानांतरासाठी जिल्हानिहाय दलाल नेमले आहेत. मुंबईतील ‘मित्तल’ टॉवर येथून स्थानांतराची सूची ‘व्हॉट्सॲप’वर येते आणि स्थानांतर होते. उपजिल्हाधिकारी दर्जाचे ६४ अधिकारी अजूनही स्थानांतराच्या प्रतिक्षेत आहेत.

५. मागील ५ वर्षांपासून भाजपची सत्ता असतांनाही आजही विदर्भाच्या प्रश्नांवर, विकासावर ठोस आणि कालबद्ध कार्यक्रम सरकारने घोषित केला नाही. गेली ५ वर्षे विदर्भाचा अनुशेष बाकी का आहे ? विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत.

कागदोपत्री रुग्णालय दाखवून वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याचा प्रयत्न !

नागपूर – अल्पसंख्यांक आणि पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे वर्ष २०१८ पासून अत्याधुनिक रुग्णालय नसतांना ते केवळ कागदोपत्री दाखवून वैद्यकीय महाविद्यालय चालू केले आहे, असा आरोप दानवे यांनी या प्रसंगी केला. ‘ॲलोपॅथी’चे महाविद्यालय असतांनाही ६० खाटांच्या आयुर्वेदिक रुग्णालयास अनुमती घेतली गेली. हे गंभीर आहे.