अल्पवयीन मुलीला त्रास देणार्या युवकावर जुजबी कारवाई केल्याचे प्रकरण
सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील एका अल्पवयीन युवतीने अक्षय लांडगे हा युवक त्रास देत असल्याविषयी शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली होती; मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करत शिरवळ पोलिसांनी संबंधित युवकावर किरकोळ कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून लांडगे याने अल्पवयीन युवतीला अधिकच त्रास देण्यास प्रारंभ केला. या त्रासाला कंटाळून अल्पवयीन युवतीने स्वतःची जीवन यात्रा संपवली होती. याची नोंद राज्य महिला आयोगाने घेत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले. (महिला पोलीस अधिकारी असूनही एका अल्पवयीन मुलीचा त्रास समजू न शकणे, हे पोलिसांची संवेदनशीलता संपल्याचे लक्षण आहे. अशा पोलिसांचा जनतेला कधी आधार वाटू शकेल का ? – संपादक)
संपादकीय भूमिका :युवतींवरील लैंगिक अत्याचारांना सहजतेने घेणारे पोलीसच त्यासाठी खरे उत्तरदायी आहेत ! |