चि. अमोल बधाले यांची कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (चि. अमोल बधाले यांची आई)
१ अ. लहान वयात कुटुंबाचे दायित्व घेऊन कुटुंबाला आधार देणे : ‘चि. अमोल लहान वयापासूनच कुटुंबाचे दायित्व सांभाळत आहे. आमच्या जीवनात पुष्कळ कठीण प्रसंग आले. तेव्हा त्याने कुटुंबाला आधार दिला आणि त्या प्रसंगांकडे साधनेच्या दृष्टीने पाहून ‘ते कसे हाताळायचे अन् त्यातून कसे बाहेर पडायचे ?’, हे तो आम्हाला सतत सांगत असतो. काही प्रसंगांत ताण आला, तर तो म्हणतो, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आहेत. ते सगळे पहातील.’’
१ आ. माझ्याकडून काही चुकले, तर तो मला ‘साधनेच्या दृष्टीने कसे असायला हवे’, ते सांगतो आणि मला ‘कसे प्रयत्न करणार ?’ ते विचारतो. तो माझ्याकडे या संदर्भात पाठपुरावाही घेतो.
१ इ. सेवेची तळमळ : अमोलला वेगवेगळ्या सेवा शिकायला आवडतात आणि तो दायित्व घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अमोलचा विवाह सुनिश्चित झाल्यावर आम्ही सर्व जण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी ‘अमोल नवीन सेवा छान करतो. सेवेच्या संदर्भातील त्याला येणार्या अडचणी अथवा शंका यांविषयी प्रश्न विचारून जाणून घेतो’, असे त्याचे कौतुक केले.
१ उ. भावजयीशी बहिणीप्रमाणे वागणे : अमोलच्या लहान भावाची पत्नी (श्री. अतुल बधाले याची पत्नी) सौ. आनंदी बधाले हिच्याविषयी त्याला आदर आहे. ‘ती कुटुंबात नवीन आहे, तर तिला प्रेमाने समजून घ्यायला हवे’, असेे तो सांगतो. अमोल आणि सौ. आनंदी यांचे नाते दिर अन् वहिनी असे न वाटता ते भाऊ-बहिणीसारखे वाटते. कुटुंबातील कोणताही निर्णय घ्यायचा असेल, तर तो आनंदीचेही त्याविषयी मत घेतो.’
२. सौ. सुवर्णा रागमहाले (चि. अमोल बधाले यांची मावशी), तळेगाव दाभाडे, पुणे.
२ अ. अमोल सर्वांशी बोलतांना शांतपणे आणि इतरांचे मत समजून घेऊन बोलतो.
२ आ. प्रेमभाव : ‘माझा अपघात झाल्यामुळे माझ्या पायाला लागले होते. हे समजल्यावर त्याने मला, ‘तुझा अपघात झाला आणि पायाला टाके पडले, हे मला का सांगितले नाहीस ? मी आलो असतो’, असे भ्रमणभाष करून सांगितले.
२ इ. तो सोनाली आणि अतुल (बहीण आणि भाऊ) यांचे मत जाणून घेऊन त्यांच्या मतांशी सहमत रहातोे. यातच त्याच्या मनाचा मोठेपणा जाणवतो.’
३. श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. साधनेत साहाय्य करणे : ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असतांना आम्ही दोघे एका खोलीत रहात होतो. त्या वेळी मी त्याला माझ्या मनाचा होत असलेला संघर्ष सांगायचो. मला तो योग्य मार्गदर्शन करून त्यातून बाहेर काढायचा. अमोलने मला श्रीकृष्णाविषयी अनेक भावप्रयोग सांगितले आणि तो मला भावप्रयोगाची आठवण करून देतो.’
४. श्रीमती अदिती देवल (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६५ वर्षे)
४ अ. आईप्रमाणे काळजी घेणे : ‘मला वयानुसार होणार्या काही शारीरिक त्रासांमुळे वजन उचलून पायर्या चढणे इत्यादी कृती करणे मला झेपत नाही. एकदा मला अकस्मात् पुण्याला जावे लागणार होते. अमोल आणि त्याचे कुटुंबीय हे दुसर्याच दिवशी पुण्याला जायचे होते आणि १५ दिवसांनी आश्रमात परत येणार होते. गुरुकृपेने मला त्यांच्या समवेत जाता-येतांनाचे रेल्वेचे आरक्षण मिळाले; पण माझा डबा वेगळा होता. रात्री झोपतांना ‘मला एकटीला दुसर्या डब्यात झोपायला लागू नये’, यासाठी अमोल रात्री झोपायला माझ्या जागेवर गेला आणि माझी झोपण्याची व्यवस्था त्याच्या कुटुंबियांच्या समवेत केली. आम्ही पुण्याहून परत येतांना त्याची प्रकृती ठीक नव्हती, तरी त्याने माझे साहित्य उचलून गाडीत ठेवले आणि तिकीट तपासनिसाला सांगून माझी बसण्याची व्यवस्था त्यांच्या डब्यात करून घेतली. स्वतःची प्रकृती ठीक नसतांनाही त्याने माझी आईसारखी काळजी घेतली.’
५. श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ अ. शिकण्याची वृत्ती : ‘अमोल स्वतःमध्ये पालट होण्यासाठी आणि मनात सकारात्मक विचार रहाण्यासाठी सनातनच्या ग्रंथांचे अन् अन्य ग्रंथाचे वाचन करतो. त्यातील कृतीत आणायची सूत्रे तो लिहून काढतो आणि त्याप्रमाणे प्रयत्नही करतो.
५ आ. सर्व साधकांशी जवळीक साधणे : अमोल अल्पाहार किंवा महाप्रसादाला भोजनकक्षात आल्यावर ठराविक साधकांमध्येच न बसता सर्व साधकांमध्ये बसतो. त्यांच्याशी बोलून तो त्या साधकांचे मन जिंकतो आणि त्यांच्याशी जवळीक साधतो.
५ इ. साधकांना सेवेतील अडचणी सोडवण्यास साहाय्य करणे : अमोलदादा सेवा करतांना कधी कधी काही साधक येऊन त्याला सेवेतील अडचणी सांगतात. त्या वेळी तो शांतपणे त्यांना साहाय्य करतो आणि त्याला शक्य नसेल, तर तो त्यांना शांतपणे तसे सांगतो. त्याला आश्रमातील अनेक साधक संगणकाच्या अडचणींविषयी प्रश्न विचारतात. तेव्हा तो त्यांना शांतपणे आणि ‘त्यांना समजेल’, अशा पद्धतीने सांगतो.’
६. ग्रंथ सेवेशी संबंधित सर्व साधक
६ अ. अभ्यासू वृत्ती : ‘अमोलकडे अनेक सेवा आहेत. तो प्रत्येक सेवेचा अभ्यास करतो. त्यातील त्रुटी शोधतो आणि ‘त्यामध्ये कसा पालट करू शकतो ?’, याविषयी चिंतन करतो. संकलकांना काही माहिती हवी असल्यास तो ती तत्परतेनेे पुरवतो, तसेच तो नवीन सेवेचा अभ्यास करतो. अशा अनेक सेवांचा अभ्यास केल्यामुळे त्याची प्रत्येक विषयांतील प्रगल्भता वाढली आहे.
६ आ. इतरांना साहाय्य करणे
१. सेवेसाठी काही अन्य संगणकीय सूत्रेही त्यांनी धारिकांचे संकलन करणार्या साधकांना शिकवली, उदा. ‘वेब व्हॉटस अप’ ‘एखादा शब्द शोधायचा असल्यास तो कसा शोधायचा ? तो शब्द शोधतांना त्यात ‘संगणक हाताळतांना कोणती काळजी घ्यायची ?’, हेही त्या वेळी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
२. अमोलदादा सेवेत कितीही व्यस्त असला, तरी त्याला सेवेतील काही अडचण सांगितल्यावर तो ऐकून घेतो. त्याला शक्य असेल, तर ती अडचण लगेच दुरुस्तही करतो. मला संगणकीय सेवा करतांना काही अडचणी आल्या, तर तो साहाय्य करण्यास तत्पर असतो. कधीतरी अल्पाहाराची पूर्वसिद्धता करतांना कधी आम्ही दोघेच असतो. तेव्हा तो म्हणतो, ‘‘काही काळजी करू नका ‘मी’ आहे.’’ तो स्वतःच्या सेवा सांभाळून अल्पाहाराच्या सेवेत आम्हाला साहाय्य करतो.
६ इ. नियोजनकौशल्य : संकलन करतांना आमच्याकडून होणार्या चुका अल्प व्हाव्यात’, अशी त्याला तळमळ असते. त्यासाठी संकलकांचा सत्संग घेण्याचे ठरले होतेे. तेव्हा त्याने सत्संगाचेे नियोजन फार चांगल्या प्रकारे केले होते. याचा आम्हाला चांगला लाभ झाला.
६ ई. कर्तेपणा न घेणे : प्रत्येक सेवा करतांना ‘गुरुदेवांना अपेक्षित सेवा व्हावी’, याकडे त्याचा कल असतो. एकदा त्याने माझी (सौ. मीनल शिंदे यांची) धारिकेविषयीची अडचण लगेच सोडवली. तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘‘हे तुला कसे सुचते ?’’ त्या वेळी तो सहजतेने म्हणाला, ‘‘गुरुदेवच सर्वकाही सुचवतात.’’
६ उ. तत्त्वनिष्ठ : अमोलकडे आश्रमातील बालसाधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याचे दायित्व आहे. एकदा आढाव्याला केवळ २ बालसाधिका आल्या होत्या, तरीही त्याने त्या दोघींचाच नियोजित वेळेनुसार आणि आढाव्यातील सूत्रांनुसार आढावा घेतला. तो बालसाधकांना समजून घेऊन साधनेचे महत्त्व समजावून सांगतो.
६ ऊ. नेतृत्व
१. सनातनच्या ग्रंथ आणि अन्य सेवेतील साधकांना एक संगणकीय प्रणाली शिकवायची अन् त्यासंबंधी आवश्यक माहिती प्रत्येकाकडून मागवून संग्रहित करण्याची सेवा अमोलने दायित्व घेऊन चांगल्या प्रकारे केली. यातून त्याने त्या सेवेचे दायित्व सांभाळणार्या साधकांचे मन जिंकले.
२. एकदा काही बालसाधकांकडून आश्रमातील शिस्तीचे पालन झाले नाही. तेव्हापासून अमोलने बालसाधकांचा सत्संग घेतला. त्यामुळे बालसाधक ‘वहीवर नामजप लिहिणे, सायंकाळी ‘शुभंकरोति’ म्हणणे, आई-वडिलांनी सांगितल्यानुसार वागणे’ अशा प्रकारे चांगल्या कृती आचरणात आणू लागले आहेत.
६ ए. विनोद बुद्धी : अमोलमधील विनोद बुद्धी या गुणामुळे विभागातील वातावरण हसते-खेळते आणि हलके-फुलके रहाण्यास साहाय्य होते.’
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने अमोल याची आध्यात्मिक उन्नती लवकरात लवकर होऊन त्याला सर्वोच्च आनंद प्राप्त होऊ दे’, हीच गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहेे.’
७. श्री. प्रथमेश अच्युत खांडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७ अ. श्री गुरूंच्या कृपेची व्हावी तुम्हांवर सतत वृष्टी ।
बालसाधकांच्या साधनेचे दायित्व घेतो ।
दिशादर्शक असे समष्टी नेतृत्व करतो ।
उपजत आहे कला-कौशल्य आणि कवित्व ।
असे हे विविधांगी व्यक्तीमत्त्व ॥ १ ॥
वाचनाची असे फार आवड ।
गुरुकार्यासाठी नसे कसलीच आवड-नावड ।
सेवेचे प्राधान्य ठरवून करतो निवड ।
यामुळेच झाला आहे साधकांचा आधारवड ॥ २ ॥
मनाची निर्मळता आणि बुद्धीची प्रगल्भता ।
विचारांत असे तत्त्वनिष्ठता आणि सकारात्मकता ।
संवादात असे सहजता आणि सूसुत्रता ।
असे कर्तव्यतत्पर आणि जपतो कौटुंबिक जिव्हाळा ॥ ३ ॥
व्यायाम करून मिळवतो शारीरिक शक्ती ।
नित्य गुरुचरणांना स्मरून साधतो भाव आणि भक्ती ।
परिस्थिती आणि प्रकृतीशी जुळवून घेण्याची ज्ञात आहे युक्ती ।
यातूनच साधेल एक दिवस जीवनमुक्ती ॥ ४ ॥
व्यष्टीभाव वृद्धींगत होण्यासाठी ठेवली दूरदृष्टी ।
निवडली सहचारिणीच्या समृद्ध गुणांची सृष्टी ।
मिळो परस्परांच्या सहजीवनाला पुष्टी ।
श्री गुरूंच्या कृपेची व्हावी तुम्हांवर सतत वृष्टी ॥ ५ ॥
(सर्व सूत्रांचा दिनांक ६.१२.२०२३)
चि.सौ.कां. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांची सहसाधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. कु. मेघा चव्हाण
१ अ. ‘वैष्णवी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर अल्पावधीतच ती आश्रम जीवनात रुळली.
१ आ. तिच्यामध्ये भाव असल्यामुळे तिला पुढील टप्प्याच्या अनुभूती येत होत्या. तिच्यातील दैवी गुणांमुळे ‘ती उच्च लोकातील दैवी बालिकाच आहे’, असे वाटायचे.
१ इ. सेवाभाव
१. मागील काही वर्षे ती सातत्याने भक्तीसत्संगाची संहिता लिहिण्याची सेवा करत आहे. तिच्यातील तळमळ आणि भाव यांमुळे तिने अविरतपणे ही सेवा केली.
२. तिच्यातील भावामुळे ती स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकांचे भावसत्संग घेते.
३. तिला संतांच्या सेवेचीही संधी मिळाली. त्यानंतर काही कालावधीतच तिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ती जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाली.
१ ई. तिच्यातील प्रगल्भता आणि प्रतिभा यांमुळे तिच्या बोलण्यात वेगळेच सौंदर्य आहे. तिने वाढदिवसानिमित्त केलेल्या कविता उच्च भाषाशैलीतील असतात.
१ उ. संतांनी कौतुक करणे : आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेला येणार्या अनेक साधकांनी सांगितले, ‘‘तिने घेतलेल्या भावसत्संगामुळे त्यांना लाभ झाला आणि त्यांना भाववृद्धीच्या दृष्टीने प्रयत्न करणे सुलभ झाले. यासाठी संतांनी तिचे अनेकदा कौतुक करून तिला प्रसाद दिला आहे.’
२. सौ. कीर्ती जाधव, फोंडा, गोवा.
२ अ. अनेक सेवा दायित्व घेऊन करणे : ‘वैष्णवी आश्रमस्तरावरील वेगवेगळ्या सेवा दायित्व घेऊन करते, उदा. भक्तीसत्संग घेणे, दिवाळीच्या कालावधीत संपूर्ण आश्रमामध्ये पणत्या लावण्याची सेवा, अधिवेशन काळामध्ये सर्व साधक, तसेच आलेले हिंदुत्वनिष्ठ यांचे डबे बनवण्याची सेवा, तसेच आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेला आलेल्या साधकांचे भावसत्संग घेणे, त्यांचेे आढावे घेणे, अशा सेवा ती झोकून देऊन आणि स्थिर राहून करत असते.
२ आ. नियोजनकौशल्य आणि गुरुकार्याची तळमळ : ती प्रत्येक सेवेचे नियोजन योग्य पद्धतीने करते. अनेक सेवा करत असतांना ‘एका सेवेमुळे दुसरी सेवा प्रलंबित राहिली’, असे तिच्याकडून कधीच होत नाही. प्रत्येक सेवा वेळेतच पूर्ण होण्यासाठी तिची नेहमी धडपड असते. ती शांत आणि स्थिर राहून तिची सेवा पूर्ण करते. काही वेळा सेवांमधे अनेक अडचणी येतात. त्या वेळी काही प्रसंगांत तिचा संघर्ष झाला, तरी ती त्यातून बाहेर पडून ती सेवा परिपूर्ण करते.’
३. कु. मानसी अग्नीहोत्री
३ अ. नियोजनकौशल्य : ‘वैष्णवीसह सेवा करतांना ती त्या सेवेचा बारकाव्यांनीशी पूर्ण अभ्यास करते. त्यातून ‘एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे ?’, हे मला शिकायला मिळाले.
३ आ. इतरांना साहाय्य करणे : कधी कधी सेवेसाठी साधक उपलब्ध नसतात. त्या वेळी तिच्याकडे सेवेसाठी साहाय्य मागितले, तर तिची सेवा करण्याची सिद्धता असते. ती कधीच ‘नाही’, असे म्हणत नाही आणि दिलेली सेवा व्यवस्थित पूर्ण करते.’
४. सौ. तन्वी सीमित सरमळकर
४ अ. आढाव्यात परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : ‘कु. वैष्णवी आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. तेव्हा तिचा चेहरा नेहमी हसरा आणि प्रसन्न असतो. त्यामुळे तेथील वातावरणही पुष्कळ प्रसन्न असते. सत्संगात आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवते. ती आम्हाला प्रार्थना सांगत असतांना ती आम्हाला साक्षात् गुरुमाऊलीच्या चरणी घेऊन जाते. तेव्हा आम्ही सर्व जण ‘गुरुमाऊलीच्या चरणी बसून आढावा देत आहोत’, असे आम्हाला जाणवते.
४ आ. आढाव्यात पंचतत्त्वांचे अस्तित्व जाणवणे : एकदा ताई आमचा आढावा आश्रमाच्या आगाशीत बसून घेत होती. तेव्हा तेथील वातावरण पुष्कळ प्रसन्न होते. त्या वेळी ताईने आम्हाला सांगितले, ‘‘वातावरणातील वायु, सूर्यप्रकाश, आकाश, पक्षी, झाडे ही तत्त्वे जागृत झाली आहेत आणि ‘आपण त्यांना साक्षी ठेवून आपला आढावा देत आहोत’, असा भाव ठेवून आढावा द्या.’’ त्या वेळी आढावा देतांना सर्वांमध्ये उत्साह जाणवत होता. ‘ताईच्या माध्यमातून गुरुतत्त्व बोलत आहे’, असे आम्हाला अनुभवता आले.
४ इ. ताईने दिलेलेे दृष्टीकोन थेट आमच्या अंतर्मनात जातात. त्या वेळी ‘तिचे बोलणे ऐकत रहावे’, असे आम्हाला वाटते.
४ ई. गुरुदेवांप्रती भाव : एकदा तिला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत असतांनाही तिने आमचा आढावा घेतला. तेव्हा ‘ती आतून लढत आहे’, असे आम्हाला जाणवत होते. आमचा आढावा झाल्यावर ती आम्हाला म्हणाली, ‘‘केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मी आज आढावा घेऊ शकले.’’
५. सौ. रोहिणी भुकन (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
५ अ. समाधानी वृत्ती : ‘वैष्णवीला तिच्या आई-वडिलांनी जे काही दिले आहे, त्यात ती आनंदी आणि समाधानी असते.
५ आ. आधार वाटणे : वैष्णवी सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलत असते. त्यामुळे समोरच्या साधकाला तिचा आधार वाटतो.
५ इ. सेवेची तळमळ आणि इतरांचा विचार : वैष्णवीचे लग्न ठरल्यामुळे ती एक ते दीड मास सेवेला येणार नव्हती. त्यामुळे तिने सत्संगासंबंधीच्या सर्व सेवा घरी जाण्याच्या आठ दिवस आधीच पूर्ण केल्या. जेणेकरून पुढील साधकांना सेवेत अडचण येऊ नये. त्या वेळी तिला स्वतःच्या लग्नाची सिद्धताही करायची होती. हे सर्व तिने स्थिर राहून केले.
५ ई. वैष्णवीच्या आवाजात माधुर्य आहे. सत्संगाच्या वेळी ‘तिचा आवाज ऐकत रहावा’, असे वाटते.
५ उ. साधनेत साहाय्य करणे : ती आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. ‘आम्ही कुठे अल्प पडतो’, ते ती अचूक ओळखते आणि आम्हाला साहाय्य करते. ती आमचे साधनेचे प्रयत्न चांगले व्हावेत, यासाठी ती आम्हाला सतत साहाय्य करत असते.
५ ऊ. भाव : वैष्णवीमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, तसेच सर्व संत अन् सद्गुरु यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांच्याविषयी बोलत असतांना तिची सतत भावजागृती होत असते.’
६. कु. मानसी प्रभू
६ अ. साधनेची तळमळ : ‘वैष्णवीची साधनेची तळमळ पाहून मीसुद्धा साधनेचे प्रयत्न करण्यास उद्युक्त होते. ती नामजपादी उपाय गांभीर्याने करते आणि भावजागृतीसाठी नियमित प्रयत्न करते. तिला भगवान श्रीविष्णु फार प्रिय आहेत. ती श्रीविष्णूला तिचे वडील मानते आणि प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करण्याचा प्रयत्न करते.
६ आ. वैष्णवीशी बोलल्यानंतर हलके वाटणे : ती मला भावनिक स्तरावर कधीच काही सांगत नाही. मी आजपर्यंत तिच्याशी अनेक प्रसंग मनमोकळेपणाने बोलले आहे. तिच्याशी साधनेच्या दृष्टीने बोलल्यानंतर मला हलके वाटते.’
७. श्री. संकेत भोवर
७ अ. सेवा परिपूर्ण आणि तळमळीने करणे : ‘वैष्णवी सेवा करतांना त्यामध्ये एकाग्र असते. तेव्हा तिचे दुसरे कुठेच लक्ष जात नाही. भावसत्संगाची सेवा करतांना तिला कधीकधी शारीरिक त्रासही होत असे, तरीही त्या स्थितीत त्रासावर मात करून ती त्या सेवा पूर्ण करत असे. यातून तिची सेवेबद्दल असलेली तळमळ आणि सेवेतील परिपूर्णता दिसून आली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १४.१२.२०२३