सांगली – केंद्रशासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना ‘विशेष साहाय्य योजना २०२३-२४ भाग १’ अंतर्गत विकास योजना आराखड्यातील समाविष्ट कामांना ‘निधी आणि विशेष साहाय्य योजना’, या शीर्षामधून निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसाठी ७६ कोटी ५१ लाख रुपये संमत होऊन त्यातील ४६ कोटी ५१ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी दिली.
या विकासकामात प्रामुख्याने कुपवाड येथे विविध रोगांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय विकसित करण्यासाठी ६ कोटी रुपये, सांगली येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज मार्ग (१०० फुटी रस्ता) विकसित करण्यासाठी १५ कोटी १७ लाख रुपये, सांगली येथील अहिल्यादेवी होळकर चौक ते साखर कारखाना कंपाऊंड रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ३ कोटी ५६ लाख रुपये संमत आहेत. तसेच कुपवाड शहरातील विविध रस्ते विकसित करणे, उद्याने विकास यांसह विविध विकासकामांचा समावेश आहे.