३ वर्षांत गोव्यात १ कोटी, तर वाराणसी येथे १३ कोटी पर्यटकांनी दिली भेट !
पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) : काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत वाराणसीने गोव्याला मागे टाकले आहे. एका आकडेवारीनुसार वर्ष २०२१ ते वर्ष २०२३ या कालावधीत पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात केवळ १ कोटी पर्यटकांनी भेट दिली, तर वाराणसीमध्ये ही संख्या जवळपास १३ कोटींच्या घरात पोचली आहे.
गोवा म्हणजे ‘सन’, ‘सँड’, ‘सी’, ‘कॅसिनो’, देशी-विदेशी पर्यटक अशीच प्रतिमा सर्वत्र आहे. काशीने अवघ्या २ वर्षांत गोव्याला मागे टाकले आहे.
आकडेवारी काय सांगते ?
१. वर्ष २०२१ मध्ये ६९ लाख भाविकांनी श्री काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले आणि वर्ष २०२३ मध्ये ही संख्या सुमारे १३ कोटींच्या आसपास पोचली आहे. अवघ्या २ वर्षांत पर्यटकांच्या संख्येत २० पटींनी वाढ झाली. काशी येथे रोजगारामध्ये ३४ टक्क्यांनी, तर उत्पन्न ६५ टक्क्यांनी वाढले आहे.
२. याच काळात गोव्याला भेट देणार्या पर्यटकांची संख्या केवळ १ कोटीपर्यंत गेली आहे.
३. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या बांधकामाच्या वेळी पुनर्वसनाचाही प्रश्न उपस्थित झाला होता. या वेळी कह्यात घेतलेल्या ३०० मालमत्तांशी संबंधित लोकांचेही पुनर्वसन करण्यात आले. यासंबंधीचे एकही प्रकरण न्यायालयात प्रलंबित नाही.
४. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, हा कॉरिडॉर केवळ भव्य इमारत नसून ते अध्यात्म, आपली परंपरा आणि गतिशीलता यांचे प्रतीक आहे. या कॉरिडॉरमध्ये काशीच्या आर्थिक समृद्धीचा नवीन अध्याय जोडला जाणार आहे.