संबंधित दोषींवर गुन्हा नोंदवून कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
मुंबई – तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केले होते. पत्रकार निखिल वागळे यांनी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. या द्वेषपूर्ण वक्तव्यामुळे समस्त हिंदु समाज दुखावला गेला आहे. त्यामुळे देशभरातील अनेक पोलीस ठाण्यांत या संदर्भात तक्रारी केल्या गेल्या आहेत. ११ डिसेंबर या दिवशी माटुंगा, तर १२ डिसेंबर या दिवशी वरळी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार प्रविष्ट करण्यात आली. हेट स्पीच प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे. तक्रार देतांना धर्माभिमानी सौ. रमा सावंत, सौ. शिल्पा रंजन, श्री. रंजन कलवई, श्री. रवींद्र दसारी, श्री. सत्यनारायण गाजुला, अधिवक्ता प्रसाद संकपाळ, श्री. विलास निकम, श्री परशुराम तपोवन आश्रम वसई येथील श्री. संदीप तुळसकर, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, ‘वज्रदल’चे श्री. संजय चिंदरकर, हिंद सायकल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. संघठन शर्मा, श्री. शिरीष सावंत, श्री. विकास उपाध्याय, श्री. विमल जैन, श्री. मोहन शिंदे हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक, श्री. प्रसाद मानकर, सौ. प्राजक्ता मानकर हे उपस्थित होते.
तक्रारीत म्हटले आहे, ‘कोणत्याही धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणे हा राज्यघटनेनुसार गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायालयात चालू असणार्या ‘हेट स्पीच’ संदर्भातील जनहित याचिकेत न्यायमूर्ती के. एम्. जोसेफ आणि मा. न्या. बी.व्ही. नागरत्ना यांनी २० एप्रिल या दिवशी दिलेल्या आदेशात म्हटले की, द्वेष निर्माण करेल, असे वक्तव्य करणार्यांवर तक्रारीची वाट न पहाता सरकारने स्वतःच कारवाई केली पाहिजे.’