पुणे, १२ डिसेंबर (वार्ता.) – काश्मिरी पंडितांचे असे म्हणणे आहे की, कलम ३७० मुळेच काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला. त्याची चौकशी वर्ष १९५९ मध्ये भारत सरकारने जो वंशविच्छेद कायदा पारित केला, त्यानुसार व्हावी, अशी काश्मिरी हिंदूंची मागणी आहे. आजपर्यंत याची कार्यवाही झालेली नाही. या कायद्यानुसार पुनर्वसनही अंतर्भूत आहे आणि ते सरकारला बंधनकारक आहे. त्याची कार्यवाही झाल्याविना केवळ ३७० कलम उठवून उपयोग होणार नाही. त्यामुळे काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाल्याचे मान्य करून त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ‘पनून काश्मीर’चे श्री. राहुल कौल यांनी केली. कलम ३७० रहित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांचे मत विचारले असता, त्यांनी ही मागणी केली.
श्री. राहुल कौल पुढे म्हणाले की, जी निष्पक्ष समिती स्थापन केली जाणार आहे, त्यात काश्मिरी हिंदू असावेत. त्यामुळे पुन्हा त्याच चुका होऊ नयेत. आज कश्मिरी हिंदूंची एक संपूर्ण पिढी आपल्या मूळ स्थानापासून विस्थापित झाली आहे. आमची संस्कृती, सभ्यता, चालीरीती, देवता यांच्याशी असणारे नाते पुन्हा जोडले गेले पाहिजे. यासाठी तेथील हिंदूंचा झालेला वंशविच्छेद मान्य करावा आणि विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन करावे. आमची मूळ जागा आम्हाला परत मिळावी, तरच खरे पुनर्वसन होईल. त्यासमवेत दोषींना शिक्षा मिळणेही आवश्यक आहे, तोपर्यंत आम्ही हा लढा लढत राहू.