पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर आरोग्याचे कारण देत गेली ४ वर्षे ते ब्रिटनमध्ये होते. आता तेथून ते परतले आहेत. त्यानंतर त्यांनी विधान केले, ‘‘भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांसारख्या देशांशी पाकिस्तानने संबंध सुधारण्याची आवश्यकता आहे. चीनशी सशक्त संबंध निर्माण करायचे आहेत. आम्हाला स्वतंत्र आणि सर्वसमावेशक परराष्ट्र धोरण हवे आहे. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून पाकिस्तानला आर्थिक महासत्ता करायचे आहे. इतरांशी लढून किंवा संघर्ष करून पाकिस्तानचा विकास होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या विकासासाठी आम्हाला शेजारी आणि जगाशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत.’’ इतकी वर्षे भारताला विरोध केला, भारताच्या नावाने बोटे मोडली आणि आता ‘पाकने भारताशी संबंध सुधारण्याविषयीचे गोडवे गावेत !’, हे मोठे आश्चर्यच आहे. ‘सूर्य पश्चिमेला कसा उगवला ? पाकला अचानक भारतप्रेमाचा पुळका कसा काय आला ?’ असे प्रश्न कुणालाही पडतील. ‘शरीफ इतके कसे काय ‘शरीफ’ होऊ शकतात बरं ?’, हे कोडेच आहे. अर्थात् ते लवकरच उलगडेलही ! ‘४ वर्षांनंतर परतल्यावर राजकारणाची सर्व गणिते डोळ्यांसमोर दिसू लागली आणि मग अन्य राष्ट्रांशी असलेले संबंध सुधारावेत’, हे शहाणपण शरीफ यांना विलंबाने आठवले असावे’, असे भारतियांना वाटते.
नवाज शरीफ स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान असतांना कारगिल युद्ध झाले होते. प्रत्यक्षात कारगिल युद्ध म्हणजे पाकिस्तानने भारताचा केलेला मोठा विश्वासघातच होय ! असे असतांनाही शरीफ आता इतक्या वर्षांनंतर सांगत आहेत की, मी कारगिल युद्धाला विरोध केला होता. त्यामुळे मला सत्ताच्युत करण्यात आले. शरीफ यांच्या या विधानांवर कुणीतरी विश्वास ठेवेल का ? ‘एका वेळी दोन मुखवटे पांघरण्याची पाकची जुनीच खोड आहे’, हे भारत कदापि विसरणार नाही. कारगिलच्या दृष्टीने भारतासाठी गुन्हेगार ठरलेल्या शरीफ यांच्या या विधानाच्या अनुषंगाने भारताची भविष्यातील भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नवाझ शरीफ यांनी आतापर्यंत ३ वेळा पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवले आहे. ब्रिटनमध्ये असतांना देशाची सूत्रे त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांच्याकडे होती. नवाझ शरीफ आता पाकिस्तानात परतले आहेत. त्यामुळे या पदाची लालसा त्यांना असणे हे साहजिकच आहे. थोडक्यात काय, तर ते राजकीय पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहेत. हे सर्व पहाता ‘आपल्या बाजूने वातावरणनिर्मिती व्हावी, शेजारी देशांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, आपलेच समर्थन व्हावे’, या विचारांतून शरीफ यांनी भारतप्रेमाचे गोडवे गायले आहेत, हे सर्वश्रुत आहे. महत्त्वाचे सूत्र म्हणजे समजा भविष्यात त्यांचा पक्ष सत्तेत आला, तर आर्थिक दिवाळे वाजलेल्या पाकचा कारभार चालवणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी सोपे नक्कीच नसेल. पाकमध्ये आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी त्यांना भारताशी आर्थिक संबंध प्रस्थापित करावेच लागतील. हे लक्षात घेऊन कावेबाज शरीफ अशा प्रकारे वक्तव्ये करत आहेत. पद मिळेपर्यंत भारताचे प्रेम दाखवायचे आणि भविष्यात पद मिळालेच की, मग भारतविरोधी विधाने करायला मोकळे व्हायचे, अशी दुटप्पी भूमिका शरीफ यांनी भविष्यात घेतली, तर आश्चर्य वाटणार नाही. पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे त्याचे उत्तम उदाहरण होय. सत्तेत असतांना त्यांनी भारतद्वेष्टी विधाने केली आणि सत्ता गेल्यावर भारताचे गोडवे गायले. त्यामुळे शरीफ यांच्या विधानांवर विश्वास ठेवून भारताने पाकसमवेतच संबंध सुधारण्याची घोडचूक करू नये; कारण पाकचे ‘खायचे आणि दाखवायचे दात वेगळे’ आहेत, हे नेहमीच लक्षात ठेवावे.
पाक भारतियांच्या प्रश्नांची उत्तरे देईल का ?
भारतासमवेत संबंध सुधारण्याची भाषा शरीफ यांनी केली तर आहे; पण त्यासाठी आपल्याला नेमके काय करावे लागेल, याचाही पाकने गांभीर्याने विचार करावा. ‘आतापर्यंत भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या जिहादी आतंकवाद्यांवर काय कारवाई करणार ? एकही पाकिस्तानी घुसखोर भारतात प्रवेश करणार नाही, यासाठी पाकची भूमिका काय असणार ? पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांना सुरक्षितता प्रदान करणार का ? ‘पाकव्याप्त काश्मीर’ भारताला परत देणार का ?’, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाकने द्यावीत, मग भारतासमवेतचे संबंध सुधारण्याची भाषा करावी. पाकची कुरापतखोर वृत्ती, पाकचे डावपेच, आतापर्यंत केलेले कांगावे, जागतिक पटलावर भारतद्वेषाचे पेरलेले विष हे सर्वकाही भारत पुरते ओळखून आहे. त्यामुळे पाकने संबंध सुधारण्यासाठी कितीही वेळा हात पुढे केला, तरी भारत त्या मागण्यांना भीक घालणार नाही, हे पाकने लक्षात घ्यावे.
भारताचे प्रत्युत्तर !
सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. पै-पै साठी त्याला अन्य राष्ट्रांकडे भीक मागावी लागत आहे. आर्थिक सूत्राच्या तुलनेत भारत कित्येक पटींनी पाकच्या पुढे आहे. अर्थात् भारताने स्वबळावर अर्थव्यवस्थेतील गरुडझेप प्राप्त केली आहे; पण इतकी वर्षे विद्वेषाची बीजे रोवण्यातच व्यस्त असल्याने पाकला तसे काही करणे कधी जमलेच नाही. आता तर काय, पाक शेवटच्या घटका मोजत असल्याने आर्थिक प्रगती साधणे अवघडच आहे. त्यामुळे भारतावर स्तुतीसुमने उधळून भारताच्या परराष्ट्र नीतीचे कौतुक करणार्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न शरीफ यांच्याकडून होतांना दिसत आहे. पाक भारतापेक्षा डावपेचात बुद्धीवान असला, तरी आता काळ पालटला आहे. भारतालाही आता उत्तम डावपेच खेळता येतात. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व यांच्या जोरावर भारतही आता प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत आहे. त्यामुळे स्तुतीसुमनांच्या मागील पाकच्या रणनीतीला भारत योग्य वेळी प्रत्युत्तर देईल, हे पाकने लक्षात ठेवावे !
संपादकीय भूमिकाराष्ट्रीयत्वाच्या जोरावर यशस्वी होणारा भारत स्तुतीसुमनांच्या मागून केल्या जाणार्या पाकच्या रणनीतीला प्रत्युत्तर देईल ! |