महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नागपूर येथील ३३० निर्जनस्थळी बसवण्यात येणार सीसीटीव्ही !

सीसीटीव्ही

नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नागपूरमधील ३३० निर्जनस्थळी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्याची सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिली आहे. ५ ऑक्टोबरला हिंगणा येथे एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आले होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वरील उपाययोजना करण्यात आली आहे.

या प्रकरणात नागपूर-वर्धा मार्गावरील एका निर्जनस्थळी महाविद्यालयीन विद्यार्थिनीला कुर्‍हाडीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर १२ दिवसांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आमदार मोहन मते यांनी ८ डिसेंबरला याविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित करून ‘महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे ?’ अशी विचारणा केली. वेळेअभावी यावर चर्चा होऊ शकली नाही; मात्र गृहविभागाकडून लेखी उत्तर देण्यात आले आहे. निवड केलेल्या ३३० निर्जनस्थळी पुरेशी प्रकाशव्यवस्था करणे, ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि सुरक्षारक्षक नेमणे यांसाठी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी ‘दामिनी’ पथकाद्वारे निर्जनस्थळी पहाणी पथक पाठवणे, शाळा-महाविद्यालये, मुलींची वसतीगृहे, झोपडपट्टी आदी ठिकाणी वेळोवेळी भेटी देऊन महिलांमध्ये अशा गुन्ह्यांविषयी जागृती करण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रातील सर्व निर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करण्यापेक्षा महिलांवर हात टाकण्याचे वासनांधांचे धारिष्ट्य होऊ नये, अशी जरब शासनकर्त्यांनी निर्माण करावी !