वागातोर  येथे समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे स्थानिक त्रस्त !

‘विवाह समारंभाचे ठिकाण’ ठरत आहे तापदायक !

वागातोर, ७ डिसेंबर (वार्ता.) – येथील किनारी भागातील तारांकित हॉटेल्स हे ‘विवाह समारंभाचे ठिकाण’ (डेस्टिनेशन वेडिंग’) बनले आहे. थेट समुद्रकिनार्‍यांवर विवाह समारंभ आयोजित केले जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आतषबाजी आणि संगीत वाजवले जात आहे. यामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे, तसेच ध्वनीप्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

स्थानिक नागरिक मॅक्सी डिसोझा म्हणाले, ‘‘विवाह सोहळे रात्री १० वाजता आटोपते घ्यायचे असूनही हे सोहळे रात्रभर चालूच असतात. यात भर म्हणून दारूकामाची आतषबाजी आणि मोठ्या आवाजात संगीत चालूच असते. किनार्‍यावरील कचराही उचलला जात नाही. प्रशासनाने यामध्ये त्वरित हस्तक्षेप करावा आणि या ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी.’’

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा आदेश देऊनही प्रशासकीय यंत्रणा ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरली आहे. मोरजी समुद्रकिनार्‍यावरही अशाच प्रकारे ध्वनीप्रदूषण केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. कर्णकर्कश संगीतामुळे मोरजी किनार्‍यावर अंडी घालण्यासाठी येणार्‍या ‘ओलिव्ह रिडले’ कासवांच्या अधिवासावर परिणाम होत आहे, अशा तक्रारी आहेत.

संपादकीय भूमिका 

नागरिकांना तापदायक ठरणार्‍या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !