म्हापसा येथे घेतले कह्यात
म्हापसा, ७ डिसेंबर (वार्ता.) – जानेवारी २०२३ मध्ये कह्यात घेऊन हद्दपार करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक महंमद जहांगीर मोंडल (वय २४ वर्षे) याला म्हापसा पोलिसांनी पुन्हा कह्यात घेतले आहे. याविषयी माहिती देतांना पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले, ‘‘महंमद जहांगीर मोंडल हा ६ डिसेंबर या दिवशी सायंकाळी म्हापसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पदररित्या फिरत असतांना पोलिसांनी त्याला अन्वेषणासाठी कह्यात घेतले. अन्वेषणाच्या वेळी तो बांगलादेशी नागरिक असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे नव्हती आणि यामुळे त्याला कह्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात विदेशी कायदा आणि पारपत्र प्रवेश कायदा या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मोंडल याला चालू वर्षी दुसर्यांदा कह्यात घेतले !
महंमद जहांगीर मोंडल याला वेर्णा पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये कह्यात घेतले होते आणि त्यानंतर वास्को येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून देशातून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याला बांगलादेशात पाठवण्यात आले होते. तो रोजंदारीवर काम करतो आणि तो कामाच्या शोधात चालत पुन्हा बांगलादेशातील शेतातून भारतात आला. भारतात आल्यावर रेल्वेने तो गोव्यात आला. संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकाभारत हा बांगलादेशी घुसखोरांसाठी नंदनवन ठरू नये ! भारत सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा करून तो कार्यवाहीत आणावा ! |