परशुराम मंदिर ते गोविंदगड आणि मार्लेश्वर मंदिर ते पायथा असे २ ‘रोप वे’ प्रस्तावित
चिपळूण – राज्यात ८० ठिकाणी ‘रोप वे’ सिद्ध करून पर्यटनाला चालना देण्याचा महायुती सरकारचा विचार आहे. त्यातील ४ ‘रोप वे’ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पर्यटनस्थळासाठी प्रस्तावित केले आहेत. त्यामध्ये परशुराम मंदिर ते गोविंदगड आणि मार्लेश्वर मंदिर ते पायथा असे दोन ‘रोप वे’, तर सिंधुदुर्गात आंबोली आणि गगनबावडा असे दोन ‘रोप वे’ प्रस्तावित केले आहेत, असे भाजपचे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमोद जठार यांनी तालुक्यात २ दिवसांचा दौरा केला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी विधानसभा निवडणूक प्रमुख अध्यक्ष प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष राम शिंदे, शहर सरचिटणीस निनाद आवटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जठार पुढे म्हणाले, ‘‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम येथील खासदारांच्या नाकर्तेपणामुळे रखडले असून केंद्रशासन येत्या २०२४ पर्यंत तो पूर्ण करील. आपण ग्रामीण भागांतील १३० आणि शहरांतील ४० अशा एकूण १७० बुथपर्यंत पोचलो. काही बुथची पुनर्रचना केली. बुथ सक्षमीकरण करून येत्या निवडणुकीपर्यंत भाजप अधिक बळकट करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा असून त्यांच्यासमवेत येथील खासदार महायुतीचाच खासदार व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.’’