देशासाठी बलीदान देणार्‍या सैनिकांसाठी निधीसंकलनात योगदान द्या ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजदिन निधीसंकलन शुभारंभ

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले आवाहन

रत्नागिरी – देशासाठी बलीदान देणार्‍या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून असणार्‍या निधीसंकलनात अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने येथील अल्पबचत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ध्वजदिन निधीसंकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते  झाला. त्या वेळी त्यांनी आवाहन केले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांताधिकारी जीवन देसाई, साहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतोष परब आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी स्वागत करून म्हणाले, ‘‘वर्ष २०२३ साठी आपल्या जिल्ह्याने आतापर्यंत ८६ टक्के निधीसंकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही ६१ लाख १८ सहस्र रुपयांचे उद्दिष्ट आपण सर्व जण मिळून पूर्ण करू या. मागील वित्तीय वर्षात २३ लाख ५२ सहस्र १२० रुपयांचे साहाय्य विविध कारणांसाठी कल्याणकारी निधीतून वाटण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले की, सैनिकांप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनात शिस्तपालन असणे आवश्यक आहे. ८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचा आनंद असला, तरी सर्वांनी निधीसंकलनास स्वत:चे योगदान देवून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्याला अग्रेसर ठेवा. देशासाठी बलीदान देणार्‍या सैनिकांप्रती, त्यांच्या कुटुबांप्रती निधी देवून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. स्वच्छता, व्यायाम, योग्य आहार यामधून निरोगी जीवन जगण्यासाठी सैनिकांच्या शिस्तीचे विद्यार्थ्यांनी पालन करावे.

या वेळी अमर जवान प्रतिमेला पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वहाण्यात आली. वीर माता छाया कदम, शौर्य पदक धारक नायक बजरंग मोरे, माजी सैनिक अरुण आठल्ये, युद्ध विधवा, विशेष गौरव पुरस्कार प्राप्त आदींचा तसेच निधीसंकलनास योगदान देणार्‍या विभागांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

सैनिकी मुलींच्या वसतीगृहातील मुलींनी आणि अंजली लिमये यांनी या वेळी देश भक्तीपर गीते गायिली. पूर्वा पेठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. निवृत्त मेजर सुभेदार लक्ष्मण गवळी यांनी सर्वांचे आभार मानले.