‘दादर’ रेल्वे स्थानकाचे नाव पालटण्यासाठी दादर (मुंबई) येथे भीम आर्मीचे आंदोलन !

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर या दिवशी दादरमध्ये लाखोंच्या संख्येने अनुयायी आले आहेत. दादरमध्ये चैत्यभूमी असल्याने येथील नागरिकांसह भीम आर्मीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्थानकाला मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेब आंबेडकर, चैत्यभूमी नाव देण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी चालू आहे. याविषयी संबंधित अधिकार्‍यांसह बर्‍याच वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. ‘नावाची मागणी मान्य व्हावी यासाठी योग्य ते प्रयत्न केले जात आहेत’, असे अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे; मात्र अद्यापही दादर रेल्वे स्थानकाचे नाव पालटण्यात आलेले नाही. त्यामुळे या मागणीसाठी ६ डिसेंबरला भीम आर्मीने लोकशाही मार्गाने आंदोलन केले.

पुणे येथे बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक दालनात अभिवादन !

पुणे येथे बाबासाहेब आंबेडकर ज्या पुस्तक दालनात पुस्तके वाचायला किंवा खरेदी करायला यायचे त्या ठिकाणी जाऊन मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. बाबासाहेब आंबेडकर १९३२ या वर्षी पुण्यात वास्तव्यास होते आणि या वेळी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील ‘इंटरनॅशनल बूक सर्व्हिस’ येथे नियमितपणे पुस्तक खरेदीसाठी येत असत.