‘श्री रामचंद्र देव ट्रस्ट एवम् प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
जुन्नर (पुणे) – ‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण नवमी, म्हणजेच ६ डिसेंबर २०२३ या दिवशी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. ‘श्री रामचंद्र देव ट्रस्ट एवम् प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने ५ आणि ६ डिसेंबर या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि त्यांच्या पादुका यांची पालखी !
५ डिसेंबर या दिवशी सकाळी प.पू. बाबांच्या समाधीची नित्य नैमित्तिक पूजा करण्यात आली. नंतर कांदळी येथील प्रवचनकार श्री. ओंकार सुनील गुंजाळ यांचे ज्ञानेश्वर महाराजांवर प्रवचन झाले. दुपारी भंडारा झाला. सायंकाळी ‘६ एकर’ परिसर ते प.पू. बाबांच्या समाधी मंदिरापर्यंत प.पू. बाबांची प्रतिमा आणि पादुका यांची पालखी काढण्यात आली. सायंकाळी समाधीची पूजा करण्यात आली. रात्री महाप्रसादानंतर बासरीवर श्री. तन्मय जोशी (श्री. अनिल कुंटे यांचे शिष्य) आणि तबल्यावर श्री. भाग्येश मोरे यांनी ‘भजन संध्या’ हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर उपस्थित भक्तांनी बाबांची भजने म्हटली.
प.पू. बाबांच्या समाधीची पूजा आणि अभिषेक !
६ डिसेंबरला पहाटे ३ ते ४ दीपोत्सव झाला. त्यानंतर बाबांच्या समाधीची पूजा करून अभिषेक करण्यात आला, तसेच भक्तांनी बाबांची भजने म्हटली. दुपारी भंडार्यानंतर उत्सवाची सांगता झाली. या प्रसंगी प.पू. बाबांचे सुपुत्र पू. नंदूदादा कसरेकर, डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, नाशिक येथील संत पू. रामप्रभु महाराज यांच्यासह प.पू. बाबांचे अनेक भक्तगण उपस्थित होते.