वारकर्‍यांची असुविधा टाळण्यासाठी ग्रामस्थांकडून ‘आळंदी बंद’ मागे !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजपासून आरंभ झाला; मात्र आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीकरांनी ५ डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती. सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात आला. यानंतर देवस्थानच्या विश्वस्तांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले; मात्र त्याला ग्रामस्थांनी नकार दिला. अखेर दुपारनंतर वारकर्‍यांची असुविधा टाळण्यासाठी ग्रामस्थांनी ‘आळंदी बंद’चा निर्णय मागे घेतला. गावकर्‍यांनी ‘आळंदी बंद’चा निर्णय मागे घेतल्यानंतर बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे.

१. आळंदी देवस्थानच्या ३ विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली असून यात योगी निरंजननाथ, अधिवक्ता राजेंद्र उमाप आणि डॉ. भावार्थ देखणे यांचा समावेश आहे. या विश्वस्तांमध्ये एकाही स्थानिक व्यक्तीची निवड न करण्यात आल्याने ५ डिसेंबरला बंद घोषित करण्यात आला होता.

२. दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी सहस्रो भाविक-वारकरी अलंकापुरीत येण्यास प्रारंभ झाला आहे. अशा वेळी आळंदी बंद ठेवू नये; म्हणून देवस्थानने ग्रामस्थांना आवाहन केले होते; मात्र ग्रामस्थ त्यांच्या मागणीवर ठाम होते.

३. अखेर आळंदीतील चाकण चौक येथून या निषेध मोर्च्याला आरंभ झाला आणि संत ज्ञानेश्वर महाराज महाद्वार चौक येथे सभा होऊन या मोर्च्याची सांगता झाली.