दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुटख्यासह वाहतूक करणारा टेंपो जप्त !; ऐतिहासिक भिडे वाडा भुईसपाट !…

गुटख्यासह वाहतूक करणारा टेंपो जप्त !

भिवंडी – पारसनाथ कंपाऊंड येथील इमारत क्र. ई ८ समोरील सार्वजनिक रस्त्यावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून टेंपोचालकाला अटक केली, तसेच टेंपोसह प्रतिबंधित गुटखा असा ३ लाख ३१ सहस्र ४४० रुपयांचा माल जप्त केला. टेंपोचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुटख्याचे उत्पादन करणार्‍यांवर कठोर कारवाई केल्यासच हे प्रकार अल्प होतील !


ऐतिहासिक भिडे वाडा भुईसपाट !

पुणे – महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा चालू केलेला ऐतिहासिक भिडे वाडा अखेर पुणे महापालिकेने कह्यात घेऊन तो भुईसपाट करण्याची कारवाई केली आहे. तिथे राष्ट्रीय स्मारक होणार असून १३ वर्षांपासूनचा त्याचा न्यायालयीन लढा संपला आहे.


समुद्राचे पाणी गोड करण्याच्या निविदा जारी !

मुंबई – मुंबईत मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आता समुद्राच्या खार्‍या पाण्यापासून गोडे पाणी निर्माण करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या निःक्षारीकरण प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील मनोरी येथील १२ हेक्टर जागेवर या प्रकल्पातील संयंत्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर म्हणजेच २० कोटी लिटर गोडे पाणी उपलब्ध होणार आहे.


बुलढाणा येथे एस्.टी.चा अपघात !

बुलढाणा – जिल्ह्यातील पिंप्री कोरडेनजीक सकाळी एस्.टी. आणि छोट्या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन दोन्हीचे चालक गंभीर घायाळ झाले. बसमधील शाळकरी विद्यार्थ्यांसह काही प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत.


पुण्यात शाळेची बस झाडावर आदळली !

पुणे – वाघोली येथील ‘रायझिंग स्टार’ या शाळेची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये काही विद्यार्थी घायाळ झाले आहेत. अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.