दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दत्ता दळवी यांना जामीन संमत !; गिरगाव येथे पहिल्या क्यू.आर्. कोड चौकाचे उद्घाटन !…

दत्ता दळवी यांना जामीन संमत !

मुंबई – मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांची मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर १ डिसेंबर या दिवशी सुटका केली. मुंबईतील एका सार्वजनिक सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.


गिरगाव येथे पहिल्या क्यू.आर्. कोड चौकाचे उद्घाटन !

मुंबई –  कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईतील गिरगाव येथे पहिला क्यू.आर्. कोड चौक निर्माण करण्यात आला आहे.  या क्यू.आर्. कोड चौकाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा चौक उभारण्यात आला आहे. येथे येणारे पर्यटक किंवा स्थानिक यांना एका शिलेमध्ये कोरलेला क्यू.आर्. कोड स्कॅन करून सुधीर फडके यांच्या जीवनकार्याची माहिती काही क्षणांमध्ये उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमात सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके यांनी गीतरामायणाचा कार्यक्रम सादर केला.


वाहतूक पोलिसाला मोटारीने दिली धडक !

मुंबई – कुर्ला येथील एल्.बी.एस्. मार्गावर वाहतूक पोलिसाला चारचाकी गाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वाहतूक पोलीस गंभीर घायाळ झाला आहे. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कुर्ला पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. वाहनचालक नियमभंग करत पूर्ण वळण घेऊन घाटकोपरच्या दिशेला जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसाने त्याला गाडी थांबवण्याची खूण केली; परंतु चालकाने गाडीची गती वाढवली आणि थेट पोलीस हवालदाराला धडक दिली. (कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे लक्षण ! – संपादक)


पुणे-नाशिक महामार्गावर धुक्यामुळे भीषण अपघात !

पुणे – मंचर येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू  झाला आहे, तर ५ जण गंभीर घायाळ झाले आहेत. समोरचा ट्रक जीप चालकाला धुक्यामुळे दिसला नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


भाईंदर येथे ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍यास जन्मठेप !

ठाणे, १ डिसेंबर (वार्ता.) – भाईंदर भागात एका ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या टेरी जोजफ भोनक्या याला १० वर्षांच्या जन्मठेपेची, तसेच ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिनेश देशमुख यांनी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेसाठी नीतीमान नागरिक असलेले रामराज्यच हवे !