उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील सिल्कियारा बोगद्यातून १७ दिवसानंतर ४१ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात ऑस्ट्रेलियाहून बोलावण्यात आलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बोगद्याच्या कामातील तज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी भारतीय शाकाहारी जेवणाचे कौतुक केले आहे. डिस्क यांनी म्हटले, ‘भारतीय शाकाहारी अन्न अतिशय चवदार आणि आरोग्यदायी आहे. मला आता माझ्या घरी परत जायची इच्छा नाही.’
१२ नोव्हेंबरपासून सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य चालू होते. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपलाईनद्वारे अन्न, पाणी आणि औषधे पुरवली जात होती. बोगद्याच्या बाहेर तैनात असलेल्या बचाव कर्मचार्यांसाठीही जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी अर्नोल्ड डिक्स यांनाही भारतीय शाकाहारी जेवण देण्यात आले आणि ते शाकाहारी जेवणाचे चाहते झाले. ‘४१ कामगारांची सुखरूप सुटका होणे, हा एक चमत्कारच आहे’, असेही अर्नोल्ड डिक्स यांनी म्हटले होते.