संसदेचे हिवाळी अधिवेशन
नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारताबाहेर राहून भारताच्या विरोधात बोलणारे, गुन्हे करण्यास चिथावणी देणारे, त्यांच्यावर कारवाई करून भारतात आणण्याच्या संदर्भातील पालट कायद्यात करण्यात येणार आहे. या कायद्यात एक कलम वाढवण्यात येणार आहे. आतापर्यंत कायद्यात अशा प्रकारची तरतूद नसल्याने संबंधितांवर कारवाई करता येत नव्हती. आता या कलमानंतर भारताबाहेरील गुन्हेगारांवर खटले चालवता येणार आहेत.
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने व्हिडिओद्वारे एअर इंडियाच्या प्रवाशांना धमकी दिली होती. त्यावरून त्याच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवला होता; मात्र यात लावण्यात आलेल्या कलमांद्वारे त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नव्हते. आता नवीन कलमामुळे ते अधिकार मिळणार आहेत.