शासकीय समितीचा अहवाल
पणजी, २९ नोव्हेंबर (वार्ता.) : सत्तरी येथे म्हादई अभयारण्यातील सत्रे, करमळी-बुद्रूक, करंझोळ-सावर्डे आणि मावशी-झर्मे या संरक्षित क्षेत्रात जुलै २०२१ मध्ये भूस्खलन झाले होते. याला भूवैज्ञानिक, मानवनिर्मित कृती आदी अनेक कृती उत्तरदायी आहेत, अशी माहिती भूस्खलनावरून गोवा शासनाने स्थापन केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
(सौजन्य : Goan varta live)
भूस्खलनानंतर त्याचे कारण आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना शोधून काढण्यासाठी सरकारने या समितीची स्थापना केली होती. उत्तर गोव्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मामू हागे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि यामध्ये विविध तज्ञांचा सहभाग होता. या समितीने नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, करंझोळ-सावर्डे येथे ‘डिम केमिकल वेदरिंग’ (रासायनिक प्रक्रियेमुळे दगडाला भेगा पडणे), दगड कमकुवत होणे आणि दरी असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर भूस्खलन झाले. घटनास्थळी जरी दाटीदाटीने जंगल असले, तरी काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने तेथील माती ठिसूळ झाली होती. अभयारण्य क्षेत्रात झाडे नसलेल्या भागांत भूस्खलन अधिक प्रमाणात झाले आहे. वन क्षेत्र जे नष्ट करण्यात आले आहे, तेथे वनसंपदा आणि जैवविविधता होती. सत्रे येथे १ लाख ६१ सहस्र २८१ चौ.मी., करमळी-बुद्रूक येथे १० सहस्र ४०४ चौ.मी. आणि मावशी-झर्मे येथे ८ सहस्र ४४७ चौ.मी. भूमीत भूस्खलन झाले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशा घटनांच्या कारणांवर दीर्घ कालावधीसाठी अभ्यास करणे, समाज आणि पर्यावरण यांचे आंतरिक नाते, भूवैज्ञानिक कारणे, मानवाचा हस्तक्षेप आदी कारणांवर दीर्घकालीन अभ्यासाची आवश्यकता आहे. भूस्खलन टाळण्यासाठी विशेष पद्धतीने यंत्रणा राबवावी लागेल.