सातारा येथे अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – शहरासह वाई, जावळी, महाबळेश्वर, पाचगणी आणि उत्तर सातारा तसेच पश्चिम सातारा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य अवकाळी पाऊस झाला. या पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये तसेच तळघरातील दुकान गाळ्यांमध्ये शिरल्याने मोठी आर्थिक हानी झाली. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वत्र अंधार झाला. अवकाळी पावसामुळे अनेक इमारतींच्या तळघरातील दुकान गाळ्यांमध्ये पाणी शिरून इलेक्ट्रॉनिक साहित्य, शालेय साहित्य यांची मोठी हानी झाली.

पाण्यासमवेत गाळ वाहून आल्यामुळे नागरिकांच्या घरात घोट्याएवढा चिखल साचला होता. सातारा शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणार्‍या कोटेश्वर टाकीमध्ये बाजूच्या ओढ्याचे पाणी शिरल्यामुळे सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत झाला. अनेक ठिकाणी विद्युत् जनित्रे नादुरुस्त झाल्यामुळे परिसरात अंधार पसरला होता.