दुचाकीवरून प्रवास करणार्‍या तिघांना रोखणार्‍या साहाय्यक फौजदाराला धडक !

साहाय्यक फौजदार गंभीर घायाळ !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – बोरिवली (पूर्व) येथे नाकाबंदीच्या वेळी एकाच दुचाकीवरून तिघेजण प्रवास करत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; पण आरोपी दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने दुचाकी चालवून साहाय्यक फौजदाराला धडक देऊन घायाळ केले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे शिरस्त्राण आणि वाहन परवानाही नव्हता. किरण माळी (वय २१ वर्षे) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार वसंत सालकर (वय ५० वर्षे) हे पालघरमधील वसई येथील रहिवासी असून ते साहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. दुचाकीच्या धडकेमुळे सालकर खाली कोसळले. यात त्यांचा उजवा पाय आणि डोके यांना गंभीर दुखापत झाली. किरण माळी यांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला; पण अन्य पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. या प्रकरणी अधिक अन्वेषण चालू आहे. किरण यांच्या मागे या वेळी सुजल जाधव (वय २० वर्षे) आणि सिद्धेश शिंदे (वय १९ वर्षे) हे दोघे बसले होते.

संपादकीय भूमिका :

कायद्याचा धाक नसल्याचा परिणाम ! वाहतुकीच्या संदर्भात बेशिस्त वर्तन करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !