पुतळा परत बसवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन !

हडलगे (कोल्हापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यावर गावात तणाव

हडलगे (जिल्हा कोल्हापूर) – गावात काही शिवभक्तांनी २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा बसवला होता, तसेच परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते. हा पुतळा विनाअनुमती बसवल्याचे कारण पुढे करत महसूल आणि पोलीस प्रशासनाने तो मोठ्या पोलीस बंदोबस्तात तात्काळ हटवला. हा पुतळा हटवल्यावर गावात तणावाचे वातावरण असून पुतळा परत बसवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन चालू केले आहे. शिवभक्त तरुण मोठ्या संख्येने गावात गोळा झाले असून घोषणा देत, धरणे आंदोलन चालू आहे.

‘ग्रामस्थ आणि शिवभक्त यांनी रीतसर अनुमती घ्यावी, आम्ही ती देऊ’, असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे; मात्र आपल्या मागणीवर शिवप्रेमी ठाम आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणे शिवभक्तांचा अवमान ! – संभाजीराव भोकरे

या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी देव, देश, धर्म यांसाठी लढाई केली, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रात्रीतून हटवणे हा सर्व शिवभक्तांचा अवमान आहे. याचसमवेत पोलीस प्रशासनाने २ शिवभक्तांना अटक केली आहे. तरी हा पुतळा आहे, तिथेच लावून शिवभक्तांची तात्काळ मुक्तता करावी.’’