राफेल विमानांना काहीही सापडले नाही !
इंफाळ (मणीपूर) – येथील विमानतळावर उडणारी अज्ञात वस्तू दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर आणि याचा एक व्हिडिओही प्रसारित झाला. त्यानंतर भारतीय वायूदलाने या वस्तूच्या शोधासाठी दोन राफेल लढाऊ विमाने पाठवली. अत्याधुनिक सेन्सर्स असलेल्या या विमानांनी संशयित भागात शोधाशोध केली, परंतु ती वस्तू कुठेही सापडली नाही. या घटनेमुळे अनेक व्यावसायिक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. या विमानांच्या उड्डाणाच्या वेळा पालटण्यात आल्या.
वायूदलाच्या ‘ईस्टर्न कमांड’ने ट्वीट करून सांगितले की, भारतीय वायूदलाने इंफाळ विमानतळावरील कथित ‘यू.एफ्.ओ.’शी (‘यू.एफ्.ओ.’ (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट), म्हणजे उडणारी अज्ञात वस्तू) संबंधित व्हिडिओच्या आधारावर सुरक्षेसाठी ‘एअर डिफेन्स रिस्पॉन्स मेकॅनिझ्म’ प्रणाली सक्रीय केली; परंतु अशी कोणतीही उडणारी वस्तू आढळलेली नाही.