गणपतीपुळे येथील देवमाशाच्या शवविच्छेदनाचा अहवाल !
रत्नागिरी – तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनार्यावर शर्थीचे प्रयत्न करून खोल समुद्रात सोडलेले देवमाशाचे पिल्लू १५ नोव्हेंबरला मृतावस्थेत मालगुंड खाडीकिनारी आढळले. त्यानंतर १६ नोव्हेंबरला गोवा येथील पथकाने माशाचे शवविच्छेदन केले. या अहवालात आईच्या दुधाअभावी आणि मानसिक तणाव यांमुळे देवमाशाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
१३ नोव्हेंबरला समुद्रात ओहोटीच्या वेळी देवमाशाचे पिल्लू गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळले होते. अनुमाने सहा महिन्यांचे हे पिल्लू २० फूट लांब आणि ४ टन वजनाचे होते. त्याला २-३ वेळा समुद्रात पुन्हा सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी ४० तास बचाव कार्य (रेस्क्यु ऑपरेशनही) राबवले होते. त्यानंतर त्याला सुखरूपरित्या समुद्रात सोडण्यात आले होते; मात्र १५ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला होता.
हे पिल्लू त्याच्या आईपासून दुरावले त्यामुळे दुधाअभावी त्याची उपासमार झाली. तसेच ते कळपापासून लांब गेल्यामुळे त्याच्यावर मानसिक ताण आला आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले आहे.
माणसांमध्ये आढळणार्या भावना देवमाशातही !
देवमासा हा सस्तन मासा आहे. त्याची पिल्ले २ वर्षांची होईपर्यंत आईच्या दुधावरच जगतात. त्यांना शिकारही आईच करून देते. ३ वर्षांची झाल्यानंतर ही पिल्ले स्वतःच शिकार करू लागतात. माणसांपेक्षा अधिक संवेदनशीलता या माशांमध्ये असते. इतर माशांप्रमाणे देवमासाही कळपानेच वावरतो; मात्र आई आणि तिची पिल्ले कळपापासून थोडे वेगळे असतात. एखादे पिल्लू दगावले, तर त्याची आई शोकही व्यक्त करते. माणसांमध्ये आढळणार्या भावना देवमाशातही मोठ्या प्रमाणात आढळतात.
याविषयी शिरगाव मत्स्य महाविद्यालयाच्या प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले की,
देवमासा अधिक वजनदार असतो. गणपतीपुळे किनार्यावर आलेले पिल्लूच अनुमाने ४ टन वजनाचे होते. असे वजनदार मासे पाण्यात स्वतःचे वजन आरामात पेलतात; मात्र जेव्हा ते किनार्यावर येतात किंवा वाळूत अडकून रहातात, तेव्हा त्यांचे वजन त्यांच्याच जिवावर बेतू शकते. अशा वेळी त्यांचे फुप्फुस तुटून अंतर्गत रक्तस्राव होण्याची भीती अधिक असते.
चिपळूणच्या परिक्षेत्र वनअधिकारी राजश्री कीर यांनी सांगितले की, देवमाशाचे पिल्लू कार्यक्षेत्राबाहेर किंवा कळपाबाहेर गेले, तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो. त्यात ते दगावण्याची भीती असते. त्यामुळे संकटात सापडलेल्या प्राण्यांच्या साहाय्यासाठी अधिक गतीने हालचाल करणे आवश्यक असते.