ओबीसींना ज्‍या निकषावर आरक्षण दिले, त्‍याच निकषावर आम्‍हालाही आरक्षण द्या ! – मनोज जरांगे-पाटील

मनोज जरांगे-पाटील

विटा (जिल्‍हा सांगली) – गेल्‍या ७० वर्षांपासून आम्‍ही आरक्षणाची मागणी करत आहोत; मात्र पुरावे नाहीत म्‍हणून आम्‍हाला आरक्षण डावलण्‍यात आले. आमचे पुरावे कुणी लपवून ठेवले ? आता आंदोलन चालू झाल्‍यावर सरकारला जाग आली. मराठ्यांची एकजूट पाहून सरकारने नोंदी पडताळण्‍यास प्रारंभ केला. आता प्रत्‍येक जिल्‍ह्यात नोंदी सापडत आहेत, मग आता आरक्षण देण्‍यास काय अडचण आहे ? ओबीसींना ज्‍या निकषावर आरक्षण दिले, त्‍याच निकषावर आम्‍हालाही आरक्षण द्या. १ डिसेंबरपासून प्रत्‍येक गावात साखळी उपोषण चालू करा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. ते विटा येथे १७ नोव्‍हेंबरला सकल मराठा समाजाच्‍या वतीने आयोजित सभेत बोलत होते.

मनोज जरांगे-पाटील पुढे म्‍हणाले, ‘‘२४ डिसेंबरपर्यंत आपण सरकारला वेळ दिला असून तोपर्यंत आरक्षण न मिळाल्‍यास पुढील दिशा ठरवू; पण तोपर्यंत आपले आंदोलन शांततेत चालू ठेवा. कुणीही आत्‍महत्‍या करू नका. माझ्‍या जीवात जीव आहे, तोपर्यंत मागे हटणार नाही. आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्‍प्‍यात आहे. आज विटा येथे एकही दुकान उघडे नाही, हाच संदेश संपूर्ण राज्‍यात गेला पाहिजे. सरकारने ही चेतावणी समजून घेण्‍याची आवश्‍यकता आहे. एक-दोन टक्‍क्‍यांसाठी मुलाला शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळत नाही. त्‍या वेळी आई-वडिलांच्‍या स्‍वप्‍नांचा चुराडा होतो. त्‍यासाठी आम्‍हाला आरक्षण हवे आहे. ७० वर्षे सत्तेत असणारे सर्व नेते आणि पक्ष यांना जाहीर आवाहन आहे. मराठा समाजाने तुम्‍हाला पुष्‍कळ काही दिले आहे. आता समाजासाठी काम करण्‍याची वेळ आली आहे.’’