इस्रालयचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी व्यक्त केली खंत !
जेरुसलेम (इस्रायल) – हमासविरोधातील युद्धात अत्यल्प जीवित हानी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र दुर्दैवाने आम्ही त्यात यशस्वी ठरलो नाही, अशी खंत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्यहू यांनी एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. गाझा पट्टीत हमासवर आक्रमण करण्यापूर्वी इस्रायलने तेथील नागरिकांना दक्षिण गाझामध्ये जाण्याचे आवाहन केले होते. यासाठी पत्रकेही वाटली होती; मात्र त्या प्रमाणात नागरिकांनी स्थलांतर केले नाही आणि नंतर इस्रायलने गाझामध्ये चालू केलेल्या आक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाला आणि आजही होत आहे. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
नेतान्याहू यांनी विचारण्यात आले होते, ‘७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचा सूड उगवण्यासाठी इस्रायलकडून पॅलेस्टाईन नागरिकांच्या हत्या होत असल्याने एका पिढीला द्वेषासाठी प्रोत्साहन मिळत आहे.’ यावर नेतान्याहू म्हणाले की, कोणत्याही नागरिकाचा मृत्यू एक संकट आहे. आम्ही नागरिकांना हानी होऊ नये; म्हणून बाहेर काढण्यासाठी सर्व काही करत आहेत. दुसरीकडे हमास या नागरिकांची हानी व्हावी, यासाठीच प्रयत्न करत आहे. आमच्या आक्रमणांमुळे पॅलेस्टिनींची हानी होत आहे.