कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) आणि त्यांच्या पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) हे औषधोपचारांसाठी प्रत्येक मासाला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात येतात. त्यांची सनातनच्या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१४ नोव्हेंबर २०२३ या दिवशी यातील काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/737558.html |
‘कुर्ला (मुंबई) येथील वैद्य दाम्पत्य, वैद्य संदेश चव्हाण आणि वैद्या सौ. गायत्री चव्हाण यांच्या उपचारांचा लाभ मागील १ वर्षात भगवंताच्या कृपेने आम्हाला झाला.
१. उपचारांप्रती तळमळ आणि गांभीर्य
वैद्य संदेश चव्हाण आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांच्याकडे विविध त्रास असणारे रुग्ण सतत येत असतात. त्यात कुणाची आर्थिक स्थिति चांगली असते, तर कुणाची नसते. ‘प्रत्येकालाच उपचार कसे देता येतील ?’, याविषयी ते चिंतन करतात आणि त्यानुसार उपचारांना आरंभ करतात. ‘पैशापेक्षा रुग्ण बरा होणे, याला महत्त्व आहे’, असे त्यांना वाटते.
२. उपचार चालू करतांना चिंतन करणे आणि देव सुचवेल त्यानुसार उपचार करणे
वैद्य संदेश चव्हाण हे उपचार चालू करण्यापूर्वी काही क्षण डोळे बंद करून मग उपचार करण्यास आरंभ करतात. याविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘कोणत्या रुग्णावर कोणते उपचार करायचे ? हे ठरवलेले असते; परंतु उपचार चालू करण्यापूर्वी रुग्णाच्या त्रासाच्या दृष्टीने देव जे सुचवतो, त्यानुसार आम्ही उपचारांत पालट करतो.’’ माझ्या (श्री. वैभव आफळे यांच्या) उपचारांच्या वेळी अनेक वेळा असे घडले आहे. एकदा चिकित्सालयात जातांना माझ्या पायातील वेदना वाढल्या आणि मला चालण्यास त्रास होऊ लागला. त्या दिवशी वर्मचिकित्सा आरंभ करतांना वैद्य चव्हाण यांनी अकस्मात् ‘पायाची रक्तमोक्षण चिकित्सा करूया’, असे मला सांगितले. रक्तमोक्षण केल्यावर काही मिनिटांत मला होणार्या वेदना थांबल्या आणि मला व्यवस्थित चालता येऊ लागले. त्या वेळी ‘मला पालटलेल्या उपचारांची किती आवश्यकता होती ? आणि त्यांचा सकारात्मक परिणाम कसा झाला ?’, हे माझ्या लक्षात आले. विशेष म्हणजे त्या वेळी मी मला होणारा त्रास त्यांना सांगितला नव्हता.
३. सतत रुग्णाचा विचार करणे
‘एखादा रुग्ण त्यांच्याकडे आला आणि त्यांनी वरवरचे उपचार केले, असे होत नाही. ‘एखाद्या रुग्णाचा त्रास नेमका कशामुळे आहे ?’, याचा अभ्यास वैद्य दांपत्य करते. त्यासाठी आयुर्वेदीय ग्रंथ, उपचारपद्धती यांचा ते अभ्यास करतात आणि त्यानुसार रुग्णांवर उपचार चालू करतात. परिणामी त्यांच्याकडे येणारे रुग्ण अल्प कालावधीत वेदनामुक्त होतात.
४. समत्वभाव आणि प्रेमभाव
वैद्य संदेश आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण हे प्रतिष्ठित वैद्य असूनही त्यांचे वागणे आणि बोलणे यांत सहजता, प्रेम, नम्रता आणि आदर असतो. ते सर्वच रुग्ण आणि चिकित्सालयातील कर्मचारी यांच्याशी प्रेमाने बोलतात अन् त्यांची विचारपूस करतात. असे असल्याने त्यांची प्रत्येकाशी जवळीक आहे. दोघांचे प्रेम इतके असते की, ते चिकित्सालयाची स्वच्छता करणार्या कर्मचार्यासह बसून जेवण करणे, एखाद्या रुग्णासाठी ते लांबून उपाशी पोटानी येणार असल्यास न्याहारी बनवून आणणे इत्यादी अगदी सहजपणे करतात.
५. क्षमा मागणे
वैद्य संदेश यांना कधी चिकित्सालयात येण्यास विलंब झाला किंवा उपचारांविषयी एखादे सूत्र अथवा सूचना सांगण्याची राहून गेली, तर प्रांजळपणे संबंधित रुग्णांची हात जोडून क्षमा मागतात.
६. चिकित्सालयातील वातावरणसुद्धा सात्त्विक आहे.
७. भगवंत, सद़्गुरु आणि संत यांच्याप्रती असलेली श्रद्धा
अ. वर्ष २०२० पासून सनातन संस्थेचे साधक वैद्य चव्हाण यांच्याकडे उपचार घेण्यास जाऊ लागले. त्यांना प्रार्थना, तसेच कापराने उपाय करणे इत्यादींचे महत्त्व लक्षात आले. तेव्हापासून त्यांनीही तसे प्रयत्न नियमित चालू केले आहेत. त्यांच्याकडे येणार्या रुग्णांनासुद्धा कापराचे उपाय करण्यास सांगून त्यांचा अनुभवही विचारतात.
आ. काही ‘साधक-वैद्य’ उपचारपद्धत शिकण्यासाठी त्यांच्या चिकित्सालयात गेले होते. त्या वेळी त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र उपचारांच्या ठिकाणी ठेवण्यासाठी दिले. ते त्यांनी अजूनही तसेच ठेवले आहे. या माध्यमातून ‘भगवंत सोबत आहे’, असे वैद्य संदेश चव्हाण यांना वाटते.
इ. वैद्य संदेश चव्हाण यांना भगवान शिवाच्या उपासनेविषयी विशेष जिज्ञासा आहे.
ई. सद़्गुरु राजेंद्र शिंदे, सद़्गुरु अनुराधा वाडेकर, पू. संगीता जाधव आणि पू. शिवाजी वटकर यांचा सत्संग त्यांना मिळाला आहे. त्याविषयी ते सतत स्मरण करत असतात. यातून त्यांचा कृतज्ञताभाव जाणवतो.
‘वैद्य संदेश चव्हाण आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांचे उपचार मिळणे, हे देवाचेच नियोजन आहे’, असे आम्हाला वाटते.’
– श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के),सौ. गौरी वैभव आफळे आणि कु. योगिनी वैभव आफळे, फोंडा, गोवा. (१५.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |