कोल्‍हापूर जिल्‍ह्यात ऊस आंदोलन पेटले : ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवली !

प्रतिकात्मक चित्र

कोल्‍हापूर – गेल्‍या हंगामातील उसाला प्रतिटन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ सहस्र ५०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनास आता हिंसक वळण लागले असून उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर उलटे करण्‍यात आले, तर वारणा साखर कारखान्‍याकडे जाणारे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्‍टर पेटवून देण्‍यात आले. १३ नोव्‍हेंबरला शिरोळ तालुक्‍यामध्‍ये अनेक गावांमध्‍ये साखर कारखान्‍यांकडे ऊस घेऊन जाणार्‍या गाड्या रोखण्‍यात आल्‍या आणि त्‍यांच्‍या चाकांतील हवा सोडून देण्‍यात आली.

टाकळीवाडी या गावात काही शेतकर्‍यांनी कारखान्‍याला ऊस देण्‍यात आम्‍हाला रोखू नका, असे सांगितले होते; मात्र त्‍यांचे न ऐकता संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी उसाच्‍या फडात जाऊन ऊस घेऊन जाणारी वाहतूक रोखली. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहून जिल्‍ह्यात विविध ठिकाणी, तसेच साखर कारखाने आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. दुसरीकडे कार्यकर्त्‍यांवर खोटे गुन्‍हे नोंद केल्‍याचा आरोप करत स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी हातकणंगले पोलीस ठाण्‍यावर मोर्चा काढला.