कराड, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – कराड येथे सर्वजण गुण्यागोविंदाने रहात आहेत. येथील गोष्टींसाठी प्रतिनिधी आणि नागरिक सक्षम आहेत. आमदार नितेश राणे यांनी बाहेरून येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करून भावना भडकवू नयेत, याविषयी आमदार नितेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करत कराड पोलिसांनी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी ‘समता पर्व’च्या पदाधिकार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आमदार नितेश राणे यांनी मुजावर कॉलनी येथे घडलेल्या स्फोटाविषयी घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी त्यांनी पीडित कुटुंबाविषयी चुकीचे विधान केले. त्यामुळे कराड शहरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. मुळात स्फोटाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेले शरीफ मुल्ला माहिती अधिकार कार्यकर्ते आणि समाजहिताच्या प्रश्नावर आवाज उठवणारे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी कराड शहरामध्ये विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. मुल्ला यांचे मुसलमान कुटुंब सर्वधर्मसमभावाने रहाणारे होते.