छत्रपती संभाजीनगर येथे फटाक्‍यांमुळे आगीच्‍या १० घटना !

१५ लाख रुपयांची हानी !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – शहरात एकीकडे दिवाळीचा आनंद साजरा केला जात असतांना १० ठिकाणी आग लागल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. १२ नोव्‍हेंबरच्‍या रात्री २ घंट्यांत लागोपाठ एकामागे एक आगीच्‍या घटना घडल्‍या. अग्‍नीशमन यंत्रणेचे कर्मचारी तातडीने घटनास्‍थळी गेल्‍यामुळे मोठी घटना टळली; मात्र १० ठिकाणी १५ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली. फटाके उडवतांना नागरिक आणि लहान मुले यांनी काळजी घेण्‍याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केेले आहे.

१. रात्री ८ ते १० या वेळेत ८ बंब, २ टँकर आणि १ जेसीबी यांच्‍या साहाय्‍याने ही आग आटोक्‍यात आणण्‍यात आली. फटाक्‍यांमुळे १ मुलगा किरकोळ भाजला. त्‍याच्‍यावर घाटी रुग्‍णालयात उपचार चालू आहेत.

२. शहरातील पुंडलिकनगर येथे घराला आग लागली, तर दिवाण देवडीत बंद दुकानातील मालावर पेटलेले कापड पडल्‍याने हा माल आगीच्‍या भक्ष्यस्‍थानी पडला.

३. सातारा परिसरातील अयप्‍पा मंदिरासमोरील न्‍यू इंग्‍लिश स्‍कूल येथे शाळेला एका खोलीला मोठी आग लागली. कलाग्रामजवळील एका मोठ्या वाहनांच्‍या शोरूमलाही फटाक्‍यांनी आग लागल्‍याची घटना नोंद करण्‍यात आली आहे.

४. नक्षत्रवाडी परिसरात साई नक्षत्र येथे सहाव्‍या मजल्‍यावर एका फ्‍लॅटमध्‍ये रॉकेट शिरले. त्‍यामुळे घरातील फर्निचरने पेट घेतला.

५. उस्‍मानपुर्‍यात कचर्‍याला रात्री आग लागली. याच परिसरात एका झाडानेही पेट घेतला. पाणचक्‍की परिसरातसुद्धा कचर्‍याला आग लागली. चिकलठाणा परिसरातील ट्रान्‍सफॉर्मर फटाका पडल्‍यामुळे पेटली.

संपादकीय भूमिका :

फटाके न उडवण्‍याविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश असतांनाही फटाक्‍यांच्‍या उत्‍पादनावरच सरकार काही उपाययोजना का काढत नाही ?